पुण्यात तापमानाचा पारा वाढला! शहरात पुढील दोन दिवसांत वातावरण अधिक तापदायक होणार, IMD ने काय सल्ला दिला?

राज्याच्या बहुतांश भागात भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असताना, पुण्यातही गेल्या दोन दिवसांत तापमानाचा पारा ४० अंशांजवळ रेंगाळला आहे, तर उपनगरात तापमान ४१ अंशांच्या पुढे पोहोचले आहे. उन्हाची वाढलेली तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला ‘आयएमडी’ने दिला आहे. पुढील दोन दिवसांत वातावरण अधिक तापदायक होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.

वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे चार दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात सकाळी दहापासूनच उन्हाची तीव्रता वाढून दुपारनंतर रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके बसत आहेत. मंगळवारीही हेच चित्र कायम होते, एरव्ही सकाळी जाणवणारा गारठाही ओसरला होता. नऊनंतर ऊन वाढत गेले. मात्र, सरकारी सुट्टी असल्याने अनेकांनी कामाशिवाय घराबाहेर जाणे टाळले. त्यामुळे दुपारी रस्त्यांवर शांतता होती. संध्याकाळी ऊन ओसरल्यानंतरही हवेत उकाडा होता. मध्यवर्ती पुण्यापेक्षा उपनगरांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवली. कमाल तापमानातही दोन ते तीन अंशांचा फरक होता. पुढील दोन दिवसांत तापमानातील वाढ कायम राहणार असून, रात्रीचा उकाडाही वाढण्याची शक्यता आहे.

उष्णतेपासून बचावासाठी ‘एसओपी’

मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेचा कडाका प्रचंड वाढला आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर तापमानाचा पारा ४० अंशांपलिकडे गेला आहे. उष्णतेच्या या तडाख्यापासून नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी राज्य सरकारने तीन व्यापक मानक कार्यपद्धती (एसओपी) जारी केल्या आहेत. विशेषतः असंघटित कामगार, खाण कामगार आणि कमी उत्पन्न गटांतील नागरिकांचा यामध्ये प्राधान्याने विचार करण्यात आला आहे.

पहिल्या ‘एसओपी’मध्ये रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलिस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार, रिक्षाचालक आदी बाहेर काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. भारतीय हवामान विभागाच्या येलो, ऑरेंज आणि रेड ॲलर्टनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्यासाठी विश्रांती, पाण्याचे बूथ, ओआरएस वितरण, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यांसारख्या उपाययोजनांचा यात समावेश करण्यात याला आहे.

दुसरी एसओपी चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी असून, यात उष्णतेच्या ताण व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. थंड विश्रांती केंद्रे, पाणीपुरवठा, वायूवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णतेसंबंधी आजार ओळखण्याचे प्रशिक्षण आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा यामध्ये समावेश आहे. तिसऱ्या एसओपीमध्ये उष्णताप्रतिरोधक गृहनिर्माणाचा समावेश आहे. तत्काळ, मध्यम व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांद्वारे घरांची थर्मल सुधारणा, थंड छप्पर, हरित क्षेत्रे आणि हवामान संवेदनशील नियोजन यावर यात भर देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *