प्रेमाचं प्रतीक असलेला ताज महाल ज्या शहरात विराजमान आहे, उत्तर प्रदेशातील त्या आग्रा शहरातच प्रेमाच्या नात्याला हरताळ फासणारी घटना समोर आली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवविवाहितेने पतीकडे तब्बल ९० लाख रुपयांची मागणी केली. पैसे मिळेपर्यंत शरीरसंबंध ठेवू देणार नाही, अशी अटच तिने घातली. त्यानंतर काही महिने सासरी राहत, तर काही महिने माहेरी राहून विवाहितेने सासरच्या मंडळींचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरु करण्यात आला आहे.
वर्षभरापूर्वी दोघांचा विवाह
आग्रा येथील रहिवासी असलेल्या गौरव आणि कल्पना यांचा विवाह साधारण वर्षभरापूर्वी, २९ एप्रिल रोजी झाला. मात्र दोघांमधील वैवाहिक संबंध एक दिवसापेक्षाही अधिक काळ टिकू शकले नाहीत. गौरवची बहीण मुस्कान हिने दाखल केलेल्या एफआयआरनुसार, कल्पनाने आपल्या पतीशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला. उलट त्याचा अपमानच केला.
९० लाखांची मागणी, सासूचे दागिने हिसकावले
गौरव आणि त्याच्या कुटुंबाने आपल्या वडील व भावांना ९० लाख रुपये “स्वेच्छेने” द्यावेत, यासाठी कल्पनाने वारंवार दबाव टाकल्याचाही आरोप आहे. तोपर्यंत शरीरसंबंध ठेवण्यासही तिने नकार दिला. ‘मला दागिने घालायचे आहेत’ या सबबीखाली कल्पनाने आपल्या भावांच्या साथीने, स्वतःसोबत आपल्या सासूचे दागिनेही काढून घेतल्याचा दावा केला जात आहे.
जिवंत जाळून टाकण्याच्या धमक्या
गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात, कल्पना आपल्या माहेरी निघून गेली; त्यावेळी तिने “९० लाख रुपये द्या, अन्यथा मरायला तयार राहा,” अशी धमकी दिली होती. त्यानंतर ती परतलीच नाही. तिच्या कुटुंबाकडून गौरवच्या कुटुंबाला जिवंत जाळून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. ३ सप्टेंबर रोजी कल्पनाचा भाऊ राहुल याने आपल्या वडिलांचे बँक डिटेल्स गौरवची बहीण मुस्कानला पाठवले आणि तिला अपेक्षित रक्कम ट्रान्सफर करण्याची सूचना दिली.
कुटुंबाला घरात कोंडून ठेवलं
काही महिन्यांनंतर, २५ मार्च रोजी अचानक कल्पना आपले वडील (नरेंद्र), भाऊ (विकास आणि राहुल) आणि एका मध्यस्थासह (मुन्ना मास्टर) गौरवच्या घरी येऊन धडकली. त्यांनी त्या कुटुंबाला घरातच कोंडून ठेवलं आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जर गौरवला जिवंत राहायचं असेल, तर ९० लाख रुपयांची व्यवस्था करण्यासाठी कल्पनाच्या कुटुंबाने त्याला दोन तासांची मुदत दिली.
गौरवचे ६७ वर्षीय वडील उम्मेद सिंग हे हृदयविकाराचे रुग्ण आणि दृष्टीहीन आहेत. त्यांचाही अपमान करुन आरोपींनी ‘तुम्ही मरुन जा’ असं म्हटल्याचं बोललं जात आहे. आरोपींनी ही घटना अपघात असल्याचं भासवण्यासाठी घरात लावलेल्या पाईप गॅस कनेक्शनमध्ये छेडछाड केल्याचाही दावा आहे. अखेरीस पोलिसांच्या मदतीने त्या कुटुंबाची सुखरुप सुटका करण्यात आली.
