भारताची टायटॅनिक की खजिन्याचा पेटारा? जपानच्या हल्ल्यामुळं मिळाली जलसमाधी, 75 वर्षांनंतर मिळाली 60 टन संपत्ती

 टायटॅनिक या प्रवासी जहाजाला मिळालेली जलसमाधी आणि त्यानंतर कैक वर्षांनी जहाजाच्या भग्नावशेषांसंदर्भातील माहितीबाबत सातत्यानं बोललं जातं. दरवर्षी ज्या दिवशी या जहाजाचा जलसमाधी मिळाली, त्या दिवशी जहाजाबाबतच्या कैक आठवणी समोर येतात. इतकंच काय, तर जहाजातील काही वस्तूंच्या लिलावामुळंसुद्धा टायटॅनिकची चर्चा सुरूच असते. पण, भारतीय टायटॅनिकबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? असं कोणतं जहाज होतं? हाच प्रश्न अनेकांना पडतो. पण, हे खरंय. भारतीय टायटॅनिक म्हटल्या जाणाऱ्या जहाजाचा अंतसुद्धा अतिशय दुर्दैवी होता.

नोव्हेंबर 1942 मध्ये काय घडलं होतं? 

20 नोव्हेंबर 1942 ला एक प्रवासी आणि मालवाहू जहाज मुंबईहून दक्षिण आफ्रिकेच्या दिशेनं निघालं. मात्र, ते कधीच अपेक्षित स्थळी पोहोचलं नाही. जपानी नौदलानं टॉरपिडोच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्यामुळं या जहाजाला जलसमाधी मिळाली. अब्जावधींच्या खजिन्यासह हे जहाज बुडालं, ज्याचं नाव होतं, ‘एसएस तिलवा’. जगभरातील त्याची ओळख म्हणजे ‘इंडियन टायटॅनिक’. शेकडो प्रवासी आणि अब्दावधींच्या खजिन्यासह हे जहाज समुद्रात बुडालं, तब्बल 75 वर्षांनंतर जहाजावरील खजिना शोधण्यात आला आणि तेव्हाच हे प्रकरण समोर येत त्यासाठी कैक वर्षे न्यायालयीन लढासुद्धा देण्यात आला.

जहाजावर किती प्रवासी होते? 

उपलब्ध माहितीनुसार ज्यावेळी या जहाजाला जलसमाधी मिळाली तेव्हा यावर 732 प्रवाशांसह एकूण 958 जण प्रवास करत होते. 6000 टन वजनाचा माल या जहाजावर लादण्यात आला होता. ज्यामध्ये 60 टन चांदी, ज्याची किंमत 43 मिलियन डॉलर होती तीसुद्धा लादण्यात आली होती. 23 नोव्हेंबर 1942 रोजी जपानी पाणबुडीच्या टॉरपिडोशी टक्कर होऊन हे जहाज सेशेल्सपासून 930 मैल उत्तर पूर्वेला हिंदी महासागरात बुडालं. बऱ्याच प्रवाशांनी जहाजावर असणाऱ्या जीवनरक्षक नौकांच्या मदतीनं प्राण वाचवले, मात्र तरीही 280 प्रवाशांना जहाजासोबत जीवनाचा शेवट स्वीकारावा लागला.

दीर्घकाळापर्यंत चालला खजिन्याचा शोध… 

जहाजासमवेत बुडालेल्या खजिन्याचा शोध दीर्घकाळापर्यंत घेण्यात आला आणि 75 वर्षांनंतर 2017 मध्ये ब्रिटीश कंपनीनं या संपत्तीचा शोध लावला. ज्यानंतर या संपत्तीवरून न्यायालयात बरीच वर्ष वाद चालला आणि 2024 मध्ये ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयानं दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या महायुद्धादरम्यान बुडालेल्या या जहाजाचे सर्व अधिकाल सोपवले.

या जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी 2014 मध्ये अर्जेंटम एक्सप्लोरेशन या कंपनीनं सागरी क्षेत्रात शोधमोहिम राबवली. हे जहाज भूपृष्ठापासून साधारण 4500 मीटर खोल आणि 800 मैल दूरवर विसावलं होतं. सर्वेक्षणानंतर तीन वर्षांनी जहाजावरील 2364 चांदीचे वळं सुरक्षितरित्या पाण्यातून बाहेर काढत ते ब्रिटनच्या खजिन्यात जोडण्यात आले.

ब्रिटनमध्ये हेज फंड नेता पॉल मार्शेल यांच्या मालकीच्या अर्जेंटमनं सागरी कायद्यानुसार जहाजाच्या संपत्तीवर आपला अधिकार सांगितला आणि दक्षिण आफ्रिकेकडून वसुलीसाठी काही रकमेची मागणी केली. मात्र दक्षिण आफ्रिकेनं हे दावे फेटाळत थेट सर्वोच्च न्यायालयात याविरोधात खटला लढला. अखेर 2024 मध्ये न्यायालयानं निकाल देत 23 मिलियन डॉलर किमतीची चांदी दक्षिण आफ्रिकेची असल्याचं सांगितलं, जिथं हे जहाज पोहोचणं अपेक्षित होतं आणि या संपत्तीला अधिकृत मालक मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *