तू खूप आवडतेस, तुझ्याशी शरीरसंबंध ठेवायचेत; उच्चशिक्षित तरुणीचा रस्त्यात विनयभंग, टवाळखोराला अटक

शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात एका उच्चशिक्षित तरुणीचा विनयभंग करुन तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका सराईत नराधमाला जवाहर नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी शारीरिक संबंध ठेवायचे आहेत, अशी आक्षेपार्ह मागणी करत या गुन्हेगाराने तरुणीला भररस्त्यात गाठले. तिने विरोध करताच तिचे करिअर आणि शिक्षण बरबाद करण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

काय घडलं नेमकं?

मंगेश रमेश बावस्कर , वय २५, रा. न्यायनगर असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास पीडित तरुणी त्रिमूर्ती चौकातील कलावती ज्वेलर्स परिसरातून सामान आणण्यासाठी जात होती. यावेळी आरोपी मंगेश बावस्कर याने तिचा पाठलाग केला. त्याने तरुणीला अडवून थेट शरीरसंबंधाची मागणी केली. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे म्हणत त्याने तरुणीचा उजवा हात धरुन तिला ओढले, ज्यामुळे तिची भररस्त्यात लज्जा उत्पन्न झाली.
दुसऱ्या मुलाशी बोललीस तर गाडून टाकेनपीडितेने या कृत्याचा धिक्कार केला असता, आरोपी मंगेशने आपली खरी गुन्हेगारी वृत्ती दाखवली. जर मला नकार दिलास, तर तुझ्या रुमसमोर येऊन तमाशा करेन. तुझे शिक्षण आणि करिअर बरबाद करेन, अशी धमकी त्याने दिली. इतकेच नाही तर, तू जर दुसऱ्या कोणत्याही मुलाशी बोललीस, तर तुला आणि त्याला जिवे मारेन, असा सज्जड दम त्याने भरला.

पोक्सोमधील सराईत गुन्हेगार जेरबंद

जवाहर नगर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपी मंगेश बावस्करविरुद्ध नवीन भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, आरोपी यापूर्वीही पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी आहे. अशा सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून, पुढील तपास महिला पोलीस अंमलदार उपाध्ये करत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *