‘हापूस ॲग्रो’च्या संचालकाने राहत्या घरी आयुष्य संपवलं, कोकणात खळबळ, पत्नीचा काळीज पिळवटणारा आक्रोश

रत्नागिरी तालुक्यातील आंबा व्यापारी आणि ‘हापूस ॲग्रो’चे संचालक रुपेश प्रकाश उर्फ बाब्या नागवेकर (रा. तोणदे) यांनी सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून जीव दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या पन्नाशीतच त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. कर्जाचा ताण आणि सावकारी जाचामधून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकण पट्ट्यात मोठी खळबळ उडाली आहे.

राहत्या घरात आयुष्य संपवलं

रत्नागिरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास रुपेश नागवेकर यांची पत्नी आपल्या मुलाला घेऊन बाहेर गेली होती. त्यानंतर साधारण ११ वाजता रुपेश नागवेकर हे घराच्या अंगणातील खुर्चीवर रक्ताळलेल्या अवस्थेत पडल्याचे त्यांच्याकडे कामासाठी आलेल्या महिलेला दिसले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

डोक्यात गोळी घुसली

रुपेश नागवेकर यांनी शेती संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. गोळी हनुवटीतून थेट डोक्यात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करुन बॉडी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवली आहे.

पत्नीचा काळीज पिळवटणारा आक्रोश

नागवेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तर भाऊ म्हणाला, की “माझा भाऊ कर्जाच्या प्रचंड ताणाखाली होता. त्याला गेल्या काही दिवसांपासून कोणाकोणाचे फोन आले याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीडीआर (CDR) काढून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.” मयत रुपेश नागवेकर यांचे भाऊ दीपक उर्फ बंधू नागवेकर यांनी यासंदर्भात मागणी केली आहे. या घटनेची रत्नागिरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.

यंदा कोकणात अत्यल्प असलेले आंब्याचे उत्पादन अशातच आंबा बागायतदाराने केलेली आर्थिक संकटामुळे आयुष्य संपवल्यामुळे हा विषय चिंता वाढवणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *