पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजूर झालेल्या अतिरिक्त 15 स्लॉट्सचा वापर एक मेपासून सुरू केला जाणार आहे. पुण्याहून मंगळुरू, सोलापूर आणि बागडोगरा या नव्या मार्गांवर उड्डाणे सुरू होणार आहेत. त्याशिवाय, काही मार्गांवर विमानसेवेत वाढ होणार आहे. विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होणार असल्याने प्रवाशांसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
स्लॉट्सची संख्या वाढणार
पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम जाहीर करताना एक मेपासून नवीन स्लॉटचा वापर केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. नवीन स्लॉटला मंजुरी मिळाल्याने एकूण स्लॉट्सची संख्या 220वरून 235वर पोहोचली आहे. या स्लॉटचा वापर करून विमानतळ प्रशासने मंगळुरू, सोलापूर, बागडोगरा ही शहरे पुण्यासोबत थेट जोडली आहेत. मंगळुरू व बागडोगरासाठी दररोज विमानसेवा असणार आहे.
पुणे विमानतळावरून ‘उडान’ योजनेअंतर्गत सध्या नांदेड, किशनगढ, सिंधुदुर्ग, जळगाव या चार शहरांशी विमान सेवा जोडण्यात आले आहे. या मार्गांमुळे दुर्गम भागांपर्यंत हवाईसेवा पोहोचत असून, संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळत आहे. वाढलेल्या स्लॉट्स आणि नव्या मार्गांमुळे पुणे विमानतळावरून प्रवाशांना अधिक सुविधा व पर्याय उपलब्ध होणार आहेत. सध्या विमानसेवा सुरू असलेली चेन्नई, बेंगळुरू, पाटणा या शहरांसाठीदेखील विमानसेवा वाढवण्यात आल्या आहेत. नवीन स्लॉट दिवसा असल्यामुळे त्याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.
12,000 कोटींची गुंतवणूक
दरम्यान, पुणे मार्गावरून सोलापूर ते तिरूपतीपर्यंत विमानसेवाही उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकार सुमारे 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशांतर्गत कनेकटीव्हीटी वाढवण्यावर भर देणार आहेत. यामुळे देशातील टीयर-2 आणि टीयर-3 शहरांमधील हवाई दुवे मजबूत करूण विविध प्रदेशांमधील संपर्क सुधारणार आहेत. देशातील लहान विमानतळे,हवाई पट्ट्यांच्या विकासामध्ये हा निधी गुंतवला जाणार आहे.
पुणे विमानतळाचे संचालक संतोष धोके यांनी दिलेल्या माहितीनुसार, उडान योजनेअंर्तगत पुण्यात एक मजबूत प्रादेशिक विमान वाहतूक प्रणाली उभारण्याचे उद्दिष्ट आहे. लहान शहरांमधील उत्तम कनेकटीव्हीटीमुळे पुण्याला एक कनेक्टिंग हब म्हणूनही ओळख मिळणार. सोलापूरला मिळालेल्या जोडणीमुळे नियोजित मार्गांमुळे प्रवाशांना तिरूपतीपर्यंत पोहोचणे ही सहजपणे शक्य होणार आहे.
ईशान्य भारतातील प्रवेशद्वार मानलं जाणाऱ्या बागडोगरासाठीही पुण्यावरून थेट विमानसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे या भागांतील प्रवास सोपा होणार आहे. तसेच, सोलापूर मार्गामुळे तिरूपती-सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर-तिरूपती असे दोन प्रवासी मार्ग तयार झाले आहेत. हा विस्तार केवळ पुण्यापुरता मर्यादीत नसून संपूर्ण राष्ट्रीय नेटवर्क सुधारण्यात येणार आहे.
