तरुणींचा विनयभंग करण्यासाठी तरुणावर दबाव अन् जबरदस्तीने घातली टोपी; नाशिकमधील कंपनी प्रकरणात धक्कादायक माहिती उघड

काचेच्या भिंती असलेल्या कंपनीत प्रगत करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणींचे जबरदस्ती आणि धमक्यांनी आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्नच नव्हे, तर काळी जादू (ब्लॅक मॅजिक)चा सल्ला दिल्याचा दावा करीत तब्बल साडेनऊ वर्षांपासून धर्मांतराचा डाव आखला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका धर्माबद्दल जाणीवपूर्वक वाईट बोलून तक्रार करणाऱ्यांचा चुकीचा अहवाल संशयितांनी वरिष्ठांना पाठवला होता. एका पीडित तरुणाच्या आपबितीतून हे स्पष्ट होत असून, कथित ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ही आता रडारवर आला आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेल्या ‘द केरला स्टोरी’तून या प्रकरणाची उकल झाली. त्यातील संशयित आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी, दानिश शेख हे कारागृहात असून, निदा खान हिचा शोध सुरू आहे. तर बहुराष्ट्रीय कंपनीची ‘एजीएम’ अश्विनी चैनानी ही अटकेत आहे. विनयभंगाचे सात, अत्याचारासह धर्मांतराच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे संशयितांवर नोंद आहेत.

नाशिकमध्ये ऑगस्ट २०१७ पासून ही कंपनी असून, सप्टेंबर २०१७ पासून संशयित तेथे काम करीत आहेत. त्यांनी एका तरुणाचा सन २०२२ पासून छळ केला असून, सर्व गुन्हे सन २०२२ ते २०२६ या काळातील घटनांवर आधारित आहेत.

पीडिताच्या वैयक्तिक व कौटुंबिक अडचणींवर संशयितांनी मुद्दाम चर्चा करून एका धर्माची टोपी घालण्यास प्रवृत्त केले. ती टोपी परिधान केल्यानंतर लगेच त्याचा फोटो एका ‘व्हॉटसॲप ग्रुप’वर अपलोड करून ग्रुपमध्ये पीडितालाही सहभागी केले. ‘मटा’ने शुक्रवारी (दि. १०) ‘व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे कट्टरतेची बीजे’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यावर पीडिताच्या जबाबातून शिक्कामोर्तब झाले आहे.

गंभीर बाब म्हणजे, संशयितांनी पीडिताला त्रास दूर करण्यासाठी काळी जादू करण्याचा सल्ला दिला होता. पीडिताने संशयितांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी मुख्यालयातील कार्यालयासह वरिष्ठांकडे पीडिताबाबत चुकीचा अहवाल पाठवला होता. पीडिताला इतर तरुणींसोबत सलगी करून विनयभंग करण्यासाठी संशयित प्रवृत्त करीत होते. ‘टीम लीडर’ असल्याने या संशयितांनी इतर सहकाऱ्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचे पीडिताचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *