कोकणात रखरखत्या उन्हात घरावर कोसळला बर्फाचा गोळा, वजन 5 किलो

महाराष्ट्रात सध्या उकाडा प्रचंड वाढला असून, या उकाड्यामुळं नागरिकांच्या जीवाची काहिली होताना दिसत आहे. उष्मा प्रचंड वाढत असल्यामुळं हवेची एक झुळूकसुद्धा मोठा दिलासा देताना दिसत आहे. अशा स्थितीत जर अचानकच घरावर बर्फाचा गोळा कोसळला तर? ऐकायलाच हे काहीसं विचित्र वाटत आहे ना? हे कितीही आश्चर्यकारक वाटत असलं तरीही कोकणातील सिंधुदुर्गात अशी घटना घडली आहे, ज्यावर अनेकांचाच विश्वास बसत नाहीय.

घरावर कोसळला भला मोठा बर्फाचा गोळा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली गावात घडली आश्चर्यकारक घटना.. विजय देऊउलकर यांच्या घरावर कोसळला तब्बल पाच किलोचा बर्फाचा गोळा कोसळला. हा गोळा इतका जास्त वजनाचा होता की, तो घरावर कोसळल्याने घराच्या छपराचे नुकसान झालेय. एकिकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक्याच ऊन पडलेलं असतानाच या इतक्या उन्हात बर्फाचा गोळा नेमका आला कोठून? हाच प्रश्न अनेकांना पडत आहे. दरम्यान, हा बर्फाचा गोळा कोसळला तेव्हा त्या खोलीत कोणी नसल्याने सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

दुपारी दिड वाजता आकाशातून अचानक बर्फाचा तुकडावजा गोळा कोसळला. घराच्या स्वयंपाकघरात आकाशातून पडलेला हा गोळा म्हणजे तब्बल पाच किलोची गारच होती.  ढगाळ वातावरण किंवा कोणतंच पावसाचं चिन्ह नसताना कडक उन्हात ही भली मोठी गार पडल्याने नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केलं. ज्यानंतर त्यांनी ही गार नमुना म्हणून फ्रिजमध्ये ठेवली.

कशा तयार होतात गारा? 

गेल्या काही दिवसांपासून अमुक एका ठिकाणी गारपीट झाली, वगैरे वृत्तांमुळं गारांचा उल्लेख सातत्यानं झाल्याचं पाहायला मिळालं. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीला किंवा अवकाळी पावसाच्या वेळी या गारांची निर्मिती होते असं म्हणतात. जमिनीलगतची बाष्पयुक्त हवा खूप उंचावर म्हणजेच साधारण 5 किमीहून अधिक उंच जाते तेव्हा ती गोठणबिंदूच्या खालील थंड हवेच्या संपर्कात येते. तिथं अत्यंत थंड हवेमुळे पावसाच्या थेंबांचे बर्फाच्या लहान गोळ्यांत रूपांतर होते, ज्यांना ‘गारा’ म्हणतात. गारांचा आकार साधारण बोराइतका किंवा आवळ्याइतका असतो. ज्यामुळं इतकी मोठी वजनाची गार पडणं ही दुर्मिळ घटना ठरते. गारा एकमेकांना चिकटून त्यांचा आकार आणि वजन वाढतं आणि हे वजन पेलण्याची क्षमता नसल्यानं त्या जमिनीवर कोसळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *