मुंबईमधील आरे कॉलनीमध्ये सायबर गुन्हेगारी प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत सात जणांना अटक केली असून त्यापैकी एकजण क्रिकेटपटू असल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी आरे कॉलनीमधील ज्येष्ठ नागरिकाची सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुजरातमधून तीन जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांपैकी एक आरोपी माजी रणजी क्रिकेटपटू असल्याचा दावा करतोय. या प्रकरणी यापूर्वीच चार जणांना अटक करण्यात आलेली आहे. आता करण्यात आलेल्या अटकेमुळे अटकेतील आरोपींची एकूण संख्या सात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील क्रिकेटपटू कोण हे आपण पुढे पाहू पण पहलगाम हल्ल्ल्याचा संदर्भ देत या महिलेला कसा गंडा घालण्यात आला ते जाणून घेऊयात…
पहलगाम हल्लाचा उल्लेख
सदर फसवणूक 11 फेब्रुवारी रोजी सुरू झाली. ज्येष्ठ नागरिकाला एका तमिळ भाषिक व्यक्तीचा फोन आला होता. फोन करणाऱ्याने आपण ‘चेन्नई पोलिसातील उपनिरीक्षक’ असल्याचा दावा केला. तुमचे सिम कार्ड पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी अफझल खानने वापरले होते, असं या वयस्कर व्यक्तीला सांगण्यात आलं. त्यानंतर या व्यक्तीला एक फोन नंबर देऊन ‘वरिष्ठ अधिकाऱ्याकडे’ कॉल हस्तांतरित करण्यात आला.
मुंबई एटीएसचा अधिकाऱ्याशी बोला असं सांगितलं अन्…
त्यानंतर या कथित वरिष्ठ अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागरिकाला सांगितलं की, “तुम्ही तामिळनाडू सोडून मुंबईला आला असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती आमच्याकडे आहे. तुम्हाला पोलिसांकडून ‘असहभाग प्रमाणपत्र’ आणावं लागेल. पुढे हा कॉल ‘मुंबई एटीएस’कडे हस्तांतरित करण्यात आल्याचं सांगितलं गेलं.
मोबाईल घेऊन घरभर फिरायला लावलं, कारण…
त्यानंतर, या वयस्कर व्यक्तीला एका इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ कॉल आला. या व्यक्तीच्या व्हॉट्सॲप डिस्प्ले पिक्चरवर ‘एटीएस लोगो’ होता. त्याने पोलिसांचा गणवेश घातला होता आणि तो एका खुर्चीवर बसला होता, त्याच्यासमोर अनेक फायली होत्या. या व्यक्तीने वयस्कर इसमाला फोन घेऊन घरभर फिरवण्यास सांगितले. मला घरातील प्रत्येक खोली पाहायची असून घरात फक्त कुटुंबच आहे का याची खात्री करुन घ्यायची आहे, असं म्हणत या व्यक्तीने वयस्कर व्यक्तीला फोन घेऊन घरभर फिरवलं.
खोटी कागदपत्रं पाठवल्यानंतर…
पीडित ज्येष्ठ नागरिकाला ‘अरट्टाई’ ॲप डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं. मोबाईलमधील काही प्रायव्हसी सेटिंग्ज बदलण्यास सांगितलं गेलं. तिला नोटीस, एफआयआर, अटक वॉरंट आणि गोपनीयता करार यांसारखी काही कागदपत्रे पाठवण्यात आली. आपण खरोखरच गुन्हा केला आहे असं या व्यक्तीला वाटावं म्हणून ही बनावट कागदपत्रं पाठवण्यात आली. तुमचा मुलगा बर्लिनमध्ये आहे हे आम्हाला माहीत आहे. तो मुंबईला परत येताच त्याला अटक केली जाईल, असं या पीडित महिलेला फसवणूक करणाऱ्यांनी सांगितलं तेव्हा ती घाबरली.
फसवणूक झाल्याची जाणीव…
11 ते 16 फेब्रुवारी दरम्यान, पीडित महिलेला फसवणूक करणाऱ्यांकडून अनेक फोन आले आणि त्यांनी तिला एकूण 32 लाख 70 हजार रुपये हस्तांतरित केले. “तिचा मुलगा घरी परत आल्यावर ऑनलाइन पडताळणी केल्यास” तिचे पैसे कायदेशीररित्या तिचेच आहेत, असे सांगून ते आरबीआयकडे जमा केले जातील आणि तिला परत केले जातील. 16 फेब्रुवारी रोजी, या महिलेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिने तिच्या नातीच्या मदतीने गुन्हा दाखल केला आणि पोलिसांची सूत्र हलली.
आरोपींमध्ये क्रिकेटपटूही…
अटक केलेले तिन्ही आरोपींची नावं ऋषी, हर्ष आणि निखिल अशी असून हे तिघेही फसवणुकीचे पैसे सूत्रधारांपर्यंत पोहोचवण्यात कथितरित्या सामील होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच, ऋषीचे वडील क्रिकेट प्रशिक्षक असल्याचेही पोलिसांनी नमूद केले असून ऋषीने आपण स्वत: माजी रणजी क्रिकेटपटू असल्याचं पोलिसांसमोर कबुल केलं आहे.
