सातारकरांनो लक्ष द्या! 16 गावांतून जातोय शक्तीपीठ महामार्ग, यादीत तुमचंही गाव?

शेतकऱ्यांचा विरोध, स्थानिकांचे प्रश्न अशा अडचणींवर तोडगा काढत अखेर राज्य शासनाच्या शक्तीपीठ महामार्गाच्या प्रकल्पाचा गाडा पुढच्या टप्प्यावर पोहोचला आहे. जिथं या महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मान्यता मिळाली आहे. स्थानिक स्तरावर झालेल्या आंदोलनं आणि विरोधाच्या धर्तीवर या महामार्गाच्या काही टप्प्यांमध्ये वाट वळवण्यात आली आणि त्यामुळं नव्यानं महामार्ग प्रकल्पात काही गावांचा समावेश करण्यात आला. ज्यामध्ये कासखांडी, आरगाववाडी, भुकेवाडी, धावकी अशाही गावांचा समावेश आहे. इतकंच नव्हे तर, यातून एकाच वेळी दोन हेतू साध्य झाले. जिथं महामार्गाची वाट सुकर झालीच, शिवाय काही तीर्थक्षेत्रांनाही सहज जोडणी मिळाल्यानंस तिथवर पोहोचण्याचं अंतरही कमी झालं. यामध्ये सातारकरांचासुद्धा तितकाच फायदा झाल्याची बाब लक्षात आली.

सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावांतून जातोय शक्तीपीठ महामार्ग?

मंजुरी मिळालेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यानुसार माझणी, काकणकोळे, कासखांडी, आरगाववाडी, भुकेवाडी, धावकी, दिवाड, दोडवाववाडी, वरकुटे, तासवड (सिसवड शहराबाहेरून), भाटकी, खडकी, साळदारवाडी, कन्हेर, गारवाड आणि मगरवाडी या गावांतून शक्तीपीठ महामार्ग जात आहे. ज्यामुळं या गावांना येत्या काळात नवी ओळख मिळणार ही बाब नाकारता येत नाही.

शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यानुसार णुकामाता मंदिर (माहूरगड) आता सुमारे 17 किमी, परळी वैजनाथ 11 किमी, तुळजाभवानी मंदिर 14 किमी आणि औंढा नागनाथ 14 किमी अशा अंतरावर अर्थात तुलनेनं काही दूर गेली आहेत. तर, अंबाजोगाई येथील योगेश्वरी मंदिरासह आदमापूर येथील बाळूमामा मंदिर आणि सिंधुदुर्गातील पत्रादेवी ही ठिकाणं महामार्गानजीक आली आहेत. नरसोबाची वाडी आणि जोतिबा अशी ठिकाणं या महामार्गामुळं जवळ आल्यानं येत्या काळात इथं भाविकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

का होत होता या महामार्गाचा विरोध?

सध्या शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याची चर्चा असली तरीही, या महामार्गाच्या मूळ आराखड्याला मात्र ग्रामीण भागातून मोठा विरोध झाला होता. ज्यामध्ये शेतजमिनींचं नुकसान, विस्थापनाचा धोका आणि पर्यावरणावर होणारे परिणाम अशा कारणांनी अनेक ग्रामस्थांनी आंदोलनं करत या प्रकल्पाचा विरोध केला होता. ज्यावर तोडगा काढत अखेर सुधारित आराखड्याला विचारविनिमयानंतर मंजुरी मिळाली. तेव्हा आता या सुधारित आराखड्यानुसार शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राला नेमका विकासाच्या वाटेवर किती वेगानं नेतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *