मुलीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयावरून मुलीच्या नात्यातील चार तरूणांनी केलेल्या जबर मारहाणीत १८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना फलटण तालुक्यातील ढवळपाटी गावच्या हद्दीत घडली आहे. सोमनाथ जाधव (वय १८), असे मृत मुलाचे नाव असून तो मिऱ्याचीवाडी गावचा रहिवासी होता. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. आदित्य विजय शिंदे, ओम लोखंडे, चिक्या लोखंडे आणि पिंटू लोखंडे (सर्व रा. ढवळ, ता. फलटण) अशी संशयितांची नावे असून आदित्य विजय शिंदे यास अटक करण्यात आली आहे.
मुलीच्या वडिलांनी आणि भावांनी केली मारहणा
मृत तरूणाच्या वडिलांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून चार संशयित तरूणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ जाधव हा गुरुवारी (९ मार्च) रात्री जेवण करून अंगणात झोपला होता. त्याचे एका मुलीबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग सुरू होते. त्यानंतर तो मुलीला भेटायला गेला असता मुलीच्या वडिलांनी त्याला पाहिले. मुलीच्या वडिलांनी मुलांना बोलावून घेत सोमनाथला बेदम मारहाण केली. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास सोमनाथच्याच मोबाईलवरून त्याचे वडील संदीप जाधव यांना एका व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीने त्यांना ढवळपाटी येथे बोलावून घेतले.
‘जिवंत ठेवणार नाही’
सोमनाथचे वडील त्याठिकाणी पोहोचल्यानंतर एका लाल रंगाच्या कारमधून दोन जण आणि त्यांचा मुलगा सोमनाथ खाली उतरले. तुमचा मुलगा आमच्या बहिणीशी मोबाईलवर चॅटिंग करत आहे. आम्ही त्याला मारहाण केली असून आता त्याला जिवंत ठेवणार नाही, असे त्या व्यक्तीने सांगितले. तोवर तिथे आणखी दोन जण मोटारसायकलवरून आले. चौघांनी मिळून सोमनाथला अमानुष मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी सोमनाथ पळू लागला. मात्र, संबंधितांनी पाठलाग करून गाठले. जबर मारहाण करून डांबरी रस्त्यावर आपटले. यावेळी एका स्थानिक नागरिकाने मदतीसाठी धाव घेतल्यानंतर चौघेही संशयित कार आणि दुचाकीवरून पळून झाले.
उपचारादरम्यान मृत्यू, गुन्हा दाखल
बेदम मारहाणीमुळे बेशुद्ध पडलेल्या सोमनाथला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सोमनाथचे वडील संदीप उमाजी जाधव (वय ४२) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांसह एकूण चार जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप जगताप या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
