पंढरपूरमधील Acid हल्ला प्रकरण बनाव! 21 वर्षीय तरुणीने स्वत:वरच ओतून घेतलेलं Acid; कारणही सांगितलं

पंढरपूर शहरामध्ये एका तरुणीवर अज्ञात इसमाने अॅसिड टाकल्याची धक्कादायक बातमी रविवारी, 12 एप्रिल रोजी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या तरुणीला उपचारासाठी पंढरपूर शहरातील लाईफलाईन या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपींचा शोधही सुरु केला. मात्र या प्रकरणामध्ये तरुणीनेच एक धक्कादायक खुलासा केला आहे. या तरुणीने स्वत:च स्वत:वर अॅसिड टाकून घेतल्याची कबुली पोलीस चौकशीमध्ये दिली आहे. या तरुणीने असं का केलं याचं धक्कादायक कारणही सांगितलं आहे.

भेळ खायला गेली असता हल्ला झाल्याचा दावा

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या भोळी पेट्रोल पंपाजवळ 21 वर्षीय तरुणीवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याचा दावा केला गेला. सदर तरुणी भेळ खाण्यासाठी घराबाहेर पडली होती. परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसारखं द्रव्य फेकला. जखमी अवस्थेत या तरुणीला तिला तातडीने पंढरपूरमधील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीचे डोळे वाचले, पण चेहरा आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती रविवारी सायंकाळी समोर आली.

पीडितेने काय कबुली दिली?

मात्र पोलिसांनी पीडितेची प्राथमिक चौकशी केली. तेव्हा तरुणीने स्वतःच कबुली देत हा बनवा आपणच रचल्याचं सांगितलं. या तरुणीने अॅसिडयुक्त टॉयलेट क्लीनर स्वतः विकत घेतले आणि स्वतःच्या अंगावर ओतून घेतल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत असले तरी हल्लेखोर कोणी नव्हताच असं या खुलाश्यानंतर स्पष्ट झालं. आपण स्वतःच आपल्या डोक्यावर ऍसिड ओतून घेतले असल्याचे तिने जवाबाबत सांगितले आहे. सदर तरुणीला यकृताचा आजार आहे. याचा उपचार सुरू आहे. या कारणाने नैराश्य आले होते. त्यामुळे तरुणीने ऍसिड आपल्याच अंगावर ओतून घेतले. शौचालय स्वच्छ करण्यासाठी वापरले जाणारे ऍसिड एक दुकानातून 60 रुपयांना तिने घेतले. यानंतर शहरातील मध्यवर्ती गजबजलेल्या ठिकाणी तिने अंगावर ओतून घेतले.

असं का केलं? कारण…

आता या तरुणीने असं का केलं याचा शोधही घेतला जात आहे. घरातील कौटुंबिक वाद आणि घरातील कारणांमुळे नैराश्यातून तिने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. स्वत:वर अॅसिड ओतून घेण्याआधी काही गोळ्या घेतलेल्या का? तिच्यावर मानसिक दडपण कशामुळे होते? या प्रश्नांची उत्तरं पोलिस शोधत आहेत. सध्या तिचं समुपदेशन केलं जात आहे.

स्थानिकांनी सोडला सुटकेचा निश्वास

तरुणीच प्रकृती स्थीर असून पोलीस आता तिच्या नातेवाईकांचाही जबाब नोंदवून घेत आहे. या तरुणीने असा टोकाचा निर्णय का उचलला? तिला कोणामुळे हे असं करावंसं वाटलं? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. पंढरपूरमध्ये अॅसिड हल्ल्याच्या बातमीने एकच खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणातील सत्य समोर आल्यानंतर स्थानिकांमधील हल्लेखोर मोकट फिरत असल्याची भीती नक्कीच कमी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *