एकीकडे देशभरातून नाती उद्ध्वस्त होण्याच्या बातम्या समोर येत असताना, नांदेडमध्ये एका तरुणाने नातेसंबंध जपण्यासाठी माणुसकीचे अनोखे चित्र समाजापुढे रेखाटले आहे. नांदेडच्या भारसवाड्यात भावाच्या नीधनानंतर गर्भवती वहिनीला आधार मिळावा आणि तिच्या होणाऱ्या बाळाला चांगले भविष्य मिळावे यासाठी दीराने तिचा हात धरला आहे. राजेश्वर धनुरे याने त्याची वहीनी शीतल हिच्याशी विवाह करत, कौटुंबिक जबाबदारी घेत माणुसकी जपली आहे.
विधवा वहिनीची जबाबदारी घेत, महत्त्वाचा निर्णय
ही घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील आहे. राजेश्वर धनुरे यांच्या या निर्णयाचे सगळीकडे मोठे कौतुक केले जात आहे. 24 वर्षीय संतोष धनुरे यांचा शीतलशी सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. पण या विवाहबंधनाला एक वर्षही पूर्ण झाला नव्हता, आणि त्यांच्या या हसत्या-खेळत्या नात्यात मिठाचा खडा पडला, संतोष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी शीतल तीन महिन्यांची गर्भवती होती. या कठीण परिस्थितीत शीतलचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी संतोषचा भाऊ राजेश्वर याने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
शीतलच्या सुरक्षित भविष्यासाठी गावकऱ्यांनी घेतला पुढाकार
कोणत्याही महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर ती पूर्णपणे एकटी पडते. तिच्या डोक्यावरचे छत्र हरवते. यासगळ्याचे गांभीर्य लक्षात घेता, गावकऱ्यांनी आणि सरपंच यांनी शीतल आणि राजेश्वर च्या कुटुंबियांना माणुसकीचा हा निर्णय घेण्याचा प्रस्ताव मांडला. तेव्हा कुटुंबियांनी लोक काय म्हणतील हा विचार करत त्वरीत निर्णय घेण्यास नकार दिला. मात्र, गावकऱ्यांनी त्यांची समजूत घातली आणि त्यानुसार संतोष यांचा लहान भाऊ राजेश्वरचा शीतलसोबत विवाह संपन्न करण्यात आला.
विवाहच्या खर्चाची जबाबदारी गावकऱ्यांनी घेतली
गावकऱ्यांच्या आणि कुटुंबियांच्या या निर्णयाचा मान राखत, राजेश्वरने त्याच्या वहिनीचा हात धरला. तिच्या पोटातील बाळाला वडीलांचे नाव, प्रेम आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही कुटुंबियांची परिस्थिती हलाकीची असल्याने संपूर्ण गावाने राजेश्वर आणि शीतलच्या विवाह सोहळ्याच्या खर्चाची जबाबदारी घेतली. तसेच त्यांच्या विवाह सोहळ्यात गावजेवणही देण्यात आले. नांदेडमधील लोहा तालुक्यातील भारसवाडा या गावातील समाजाने तसेच कुटुंबाने समाजातील अनिष्ट प्रथांना छेद देणारी संवेदनशीलता दाखवत, समाजापुढे एक अनोखा आदर्श मांडला आहे.
