हर्टफोर्डशायर विद्यापीठात शिकत असलेल्या दोन भारतीय विद्यार्थ्यांचा यूकेत दोन स्वतंत्र घटनांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यापैकी एक मूळ मुंबईचा रहिवासी होता. आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलतानाच तो वाहून गेल्याची माहिती आहे.
आईसोबत व्हिडिओ कॉल
मुंबईचा रहिवासी आणि फायनान्स व इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा एमएससीचा विद्यार्थी असलेला २३ वर्षीय महेश रमेश खंडागळे ३१ मार्चच्या सकाळी मित्रांसोबत वेल्समध्ये हायकिंग ट्रिपवर असताना बुडून मृत्युमुखी पावला. क्वीन्सबरी येथे राहणारा महेश हा ब्रेकन बीकन्स येथील ‘फोर वॉटरफॉल्स वॉक’ जवळ आपला नवीन गोप्रो कॅमेरा वापरत असताना हा अपघात झाला, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली.
आईची सूचना दुर्लक्षित
“तो आपल्या आईशी व्हिडिओ कॉलवर (वेबकॅम कॉलवर) बोलत होता; त्यावेळी त्याच्या आईने त्याला पाण्यात न उतरण्याबाबत सावध केलं होतं. तरीही, पाण्याची खोली किती आहे हे तपासण्यासाठी तो पाण्यात उतरला. त्याला काही समजण्याआधीच, पाण्याचा प्रवाह त्याला वाहत घेऊन गेला.” असं महेशच्या एका मित्राने सांगितलं.
महेशला केवळ पोहण्याचं प्राथमिक ज्ञान अवगत होतं. दुर्घटनास्थळ हे अत्यंत दुर्गम असल्याने, आपत्कालीन सेवांना पाचारण करण्यासाठी बराच वेळ लागला. सायंकाळी ५ ते ६ वाजताच्या सुमारास त्याची बॉडी आढळून आली” असे त्या विद्यापीठातील ‘इंडियन नॅशनल स्टुडंट्स असोसिएशन’चे यूके प्रतिनिधी रोहित महादेवु यांनी सांगितले.
