पुणे – नातवाचा मृतदेह पाहून आजोबांना संशय; सत्य उघड झाल्यानंतर अख्खं बीड हादरलं

पुण्यामध्ये वास्तव्यास असणारी महिला आपल्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी बीड येथे गेली होती. तिथे गेल्यानंतर मुलाचा मृत्यू झाला. ह्रदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू झाल्याचं सर्वांना सांगण्यात आलं. इथपर्यंत सर्व काही सामान्य वाटत होतं. पण मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या आजोबांना शंका आली. त्यांनी मृतदेहाचं शवविच्छेदन करायला लावलं. यानंतर जे सत्य समोर आलं त्यामुळे सगळेच हादरले. याचं कारण मुलाचा नैसर्गिक मृत्यू झाला नव्हता तर त्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या इतक्या क्रूरपणे झाली होती, की तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल.

पाण्यात बुडवून चिमुरड्याची हत्या

आरोपी महिलेने आपल्या सहा वर्षाच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केली. निष्ठूर आईने मुलाला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार केलं. याहून संतापजनक म्हणजे त्याचा मृत्यू झाला आहे हे निश्चित करण्यासाठी जमिनीवर आपटलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा महिला आणि तिच्या प्रियकराच्या अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्यांनी हत्या केली. यानंर त्यांनी त्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बतावणी केली.

पतीपासून विभक्त राहत होती महिला

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी असलेली 27 वर्षीय बसीरन महबूब शेख पतीपासून विभक्त राहत होती. मागील 10 वर्षांपासून ती एकटी राहत होती. पतीचा मित्र मित्र राम विनायक काजेवाड याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. महबूब आणि बसीरन यांना तीन मुले होती. त्यापैकी दोन मुले त्यांच्या वडिलांकडे राहत होती, तर त्यांचा सहा वर्षांचा मुलगा आवेझ, हा त्याच्या आईच्या देखरेखीखाली होता.

अनैतिक संबंधात मुलगा ठरत होता अडथळा

“राम आणि बसीरन यांना आवेझ आपल्या नात्यात अडथळा ठरत असल्याचं वाटलं. यानंतर त्यांनी त्याची हत्या करण्याची योजना आखली. 4 एप्रिलला रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी चिमुरड्याची हत्या केली,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

जखमा पाहून आजोबांना संशय

बसीरनने आपल्या मुलाचा मृतदेह बीडमध्ये माहेरी नेला. तिने आपल्या कुटुंबाला ह्रदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. अंत्यविधीसाठी मुलाचे वडिलांकडील आजोबादेखील आले होते. जेव्हा त्यांनी मृतदेह पाहिला तेव्हा त्यांना जखमांच्या खुणा दिसल्याने संशय आला. यानंतर त्यांनी अजिबात वेळ न दवडता पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली.

आरोपी आईला अटक

पोलीस तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. यानंतर मुलाची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी बसीरनला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान तिचा प्रियकर राम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र ही घटना समोर आल्यानंतर अख्खं बीड हादरलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *