मार्चमध्ये प्रत्येक आठवड्यात चढ्या पाराचा फटका मुंबईकरांना बसल्यानंतर पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कमाल तापमानात थोडा दिलासा मिळाला होता. मात्र शुक्रवार सकाळपासूनच उकाड्याची जाणीव मुंबई परिसरामध्ये तीव्र होऊ लागली.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमान एखाद-दोन दिवस सरासरीपेक्षा अधिक होते. मात्र शुक्रवारी आर्द्रतेमुळे घाम येऊन मुंबईकरांनी सकाळच्या वेळीही अस्वस्थता अनुभवली. हा अनुभव शनिवारीही येण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी कसं होतं हवामान?
शुक्रवारी सकाळी कुलाबा येथे २५ अंश तर, सांताक्रूझ येथे २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दोन्ही केंद्रांवर सकाळच्या वेळी आर्द्रता ६० टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव मुंबईकरांना झाली. राम मंदिर येथे ३६.१ आणि विक्रोळी येथे ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. डहाणू येथे किमान तापमान २०.५ अंश सेल्सिअस होते. ठाणे केंद्रावरही सकाळच्या वेळी २४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दिवसभर महामुंबई परिसरात उष्ण वारे जाणवले. कुलाबा येथे ३३ आणि सांताक्रूझ येथे ३३.९ अंश तापमान शुक्रवारी नोंदले गेले.
पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात वाढ
एप्रिलमध्ये पश्चिम दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत दिलासादायक तापमान होते. ३१ ते ३३ अंशांदरम्यान हे तापमान होते. गुरुवारी वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल झाला आणि हे वारे पूर्वेकडून वाहायला लागले. त्यामुळे कोकण विभागात काही ठिकाणी तापमानात वाढ झाल्याचे प्रादेशिक हवामान अधिकारी सुषमा नायर यांनी सांगितले. ही स्थिती दोन दिवस कायम राहील. त्यानंतर पुन्हा एकदा तापमान थोडे कमी होईल. पुन्हा पुढच्या आठवड्यात बुधवारच्या सुमारास वाऱ्यांची दिशा पूर्वेकडून असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शुक्रवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो ॲलर्ट जारी करण्यात आला होता. तर, शनिवारी या जिल्ह्यांसोबतच पालघर आणि सिंधुदुर्ग येथेही हवा उष्ण आणि दमट असेल, अशी शक्यता आहे.
