बारामती तालुक्यातील सख्ख्या बहीण-भावाचे पार्थिव नीरा कालव्यात आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वी फलटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघेही बेपत्ता झाल्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीरा कालव्यात त्यांचे पार्थिव आढळून आले. किरण काकासाहेब चोपडे (वय २६) आणि काजल काकासाहेब चोपडे (वय २३, रा. मेखळी, ता. बारामती) अशी त्या बहीण-भावाची नावे आहेत. दरम्यान, हा घातपाताचा प्रकार आहे की दुचाकीसह कालव्यात पडल्यानं त्यांचा मृत्यू झालाय? या दोन्ही शक्यता गृहित धरून नातेपुते पोलीस तपास करत आहेत.
दोघे बेपत्ता असल्याची तक्रार
काजल काकासाहेब चोपडे ही फलटणमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षातील प्रोजेक्टसंदर्भात माहिती घेऊन प्रोजेक्ट असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा म्हणून सांगण्यासाठी भावासोबत आली होती. काम झाल्यानंतर मंगळवारी ७ एप्रिल रोजी दुपारी ते कॉलेजमधून बाहेर पडले. परंतु, घरी पोहचलेच नाहीत. त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
नीरा कालव्यात दोघांचे पार्थिव
बेपत्ता बहीण-भावाचा शोध सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते गुरसाळे हद्दीत नीरा उजवा कालव्यात दोघांचे पार्थिव आढळून आले. नातेपुते पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पार्थिव बाहेर काढून पंचनामा केला. नातेपुते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्याशी संपर्क साधला असता, ‘घातपाताची शंका घेण्यासारखी कोणतीच गोष्ट आढळून आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. दोघांच्या शरीरावर कसलीही जखम नव्हती. तसेच त्यांचे मोबाईल देखील कालव्यात सापडले. मोटरसायकलचा शोध सुरू आहे. परंतु, मोटरसायकलसह दोघे कालव्यात पडल्याने ही घटना घडली असावी का? ही शक्यता गृहित धरून देखील आम्ही तपास करत आहोत. मोबाईलचा सीडीआर मिळाल्यानंतर या घटनेवर प्रकाश पडेल’, अशी माहितीही त्यांनी दिली.
