खातेदाराची चूक नसताना 38 लाख सायबर गुन्हेगारांनी लाटले, पुण्यातील बिझनेसमनला पैसे परत द्या, हायकोर्टाचे HDFC बँकेला आदेश

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यांचे पैसे लाटण्याचे प्रकार वाढीस लागले असताना मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात महत्त्वाचा आदेश दिला आहे. पुण्यात व्यावसायिक असलेल्या बँक खातेदाराची कोणतीही चूक नसताना बँक खात्यातील त्याचे तब्बल ३८ लाख चार हजार रुपये सायबर गुन्हेगारांनी अन्य खात्यांत वळवून त्याला लुबाडल्याची गंभीर दखल घेत, ते पैसे व्यावसायिकाला देण्याचा आदेश न्यायालयाने एचडीएफसी बँकेला दिला आहे.

सहा टक्के व्याजाने परत करा

‘खातेदाराची कोणतीही चूक नसताना त्याला त्याच्या स्वत:च्या पैशांपासून पाच वर्षांहून अधिक काळपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे आठ आठवड्यांत ही रक्कम वार्षिक सहा टक्के व्याजासह परत करावेत. अन्यथा, त्या रकमेवर आठ टक्के व्याजदर लागू होईल’, असे न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे.

सिम क्लोनिंगचा व्यावसायिकाला फटका

१५ जुलै २०२१ रोजी सायबर गुन्हेगारांनी सिम-स्वॅपिंग/क्लोनिंगद्वारे ही लबाडी केली होती. ज्यामध्ये मूळ ग्राहकाचा सिम हा ‘नो नेटवर्क’मध्ये टाकला जातो आणि त्यानंतर स्वतःला ग्राहक असल्याचे भासवून बेकायदा व्यवहार केले जातात. सायबर गुन्हेगारांनी पुण्यातील व्यावसायिक सुबोध कोरडे यांच्या खात्यांमध्ये तीन अज्ञात खातेदारांची नावे लाभार्थी म्हणून समाविष्ट केली. शिवाय पैसे काढण्याची चार लाखांची मर्यादा ४० लाखापर्यंत वाढवली आणि त्यानंतर पैसे त्या लाभार्थी खात्यांमध्ये वळवले.

४१ मिनिटांत आठ व्यवहार

‘या दोन्ही व्यवहारांच्या बाबतीत बँकेकडून मला मोबाइलवर किंवा ई-मेलवर कोणताही ओटीपी आधी आला नाही. तसेच एचडीएफसी बँकेच्या तांत्रिक सुरक्षाव्यवस्थेत या व्यवहारांविषयी ‘डिक्लाइन ॲड पेयी’ आणि ‘ट्रान्झॅक्शन आयपी डज नॉट मॅच…’ असे ॲलर्ट असतानाही बँकेकडून त्या व्यवहारांना कृत्रिम पद्धतीने मान्यता देण्यात आली. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी ४१ मिनिटांत पैसे वळवण्याच्या केलेल्या आठ व्यवहारांत खात्यातून आपली इतकी मोठी रक्कम वळवली’, असे व्यावसायिकाने ज्येष्ठ वकील शरण जगतियानी व ॲड. अक्षय पानसरे यांच्यामार्फत न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *