भिवंडी शहरात पहिल्यांदाच धावणार मेट्रो, ठाणे-भिवंडी ‘मेट्रो लाइन 5’ला वेग; डेडलाइनही आली समोर

दहिसर-काशीगाव मेट्रोनंतर ठाणे शहरात धावणाऱ्या आणखी एका मेट्रोच्या कामांना वेग मिळाला आहे. ठाणे आणि भिवंडीदरम्यान मेट्रो लाइन 5 (ऑरेंज लाइन)चं काम कित्येक वर्ष सुरूच आहे. अखेर या मेट्रोसाठी एक नवीन डेडलाइन देण्यात आली आहे. या डेडलाइननुसार ठाणे-भिवंडी मेट्रो येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होऊन जानेवारी 2027पर्यंत प्रवाशांसाठी खुली करणार असल्याची शक्यता आहे.

दहिसर-काशीगाव मेट्रोमुळे दिलासा

काही दिवसांपूर्वीच दहिसर-काशीगाव मेट्रोचं लोकार्पण पूर्ण झालं. ठाणे शहर आणि हार्बर लाइनवरून धावणारी ही पहिलीच मेट्रो आहे. पहिल्या दिवसापासूनच मेट्रोला प्रवाशांकडून उदंड प्रतिसाद मिळाला. काशीगाव मेट्रो स्थानकावर सायंकाळी तर प्रवाशांचा रांगा दिसून आल्या. यामुळे ठाणे शहरात मेट्रोची गरज किती आहे हे स्पष्ट दिसून आले. सध्या ठाणे ते भिवंडी प्रवास करणाऱ्यांना बसचा वापर करावा लागतो. या बस कधी-कधी आर्धा तासाच्या विलंबाने दाखल होत असून प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तसेच, सायंकाळी वाहतूक कोंडीमुळे बसमध्ये प्रवाशांना तासांतास घालवावे लागतात. दरम्यान, ट्रेनने जाण्यासाठी प्रवाशांना दिवा रेल्वे स्थानकावरून मेमू गाडीने प्रवास करावा लागतो. या रेल्वे गाड्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे गेली अनेक वर्ष नागरिकांकडून थेट ठाणे-भिवंडी मेट्रोची मागणी केली जात आहे.

कसा असेल मार्ग?

मेट्रो लाइन 5 ही ठाणे-भिवंडी-कल्याण जोडणारी 25 किमी लांब मार्गिका असेल. यातील पहिल्या टप्प्यात ठाणे-भिवंडी मार्गिकेचं काम पूर्ण केलं जाणार असून हे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. भाजप आमदार महेश चौघुले यांनी दिलेल्या माहितीनुसार या मेट्रोसाठी ग्राऊंडवर्क आणि सर्व तांत्रिक कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. गुरूवारी भिवंडी महानागरपालिका, एमएमआरडीए आणि मेट्रो अधिकाऱ्यांनी या कामांची तपासणी केली. त्यावेळी त्यांनी हे काम डिसेंबर 2026पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली.

ठाण्यासह मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठीही भिवंडीवरून थेट रेल्वेसेवा उपलब्ध नाही. त्यामुळे दररोज प्रवाशांना ठाणे आणि कल्याणमार्गे बसने प्रवास करून मुंबई गाठावी लागते. मेट्रो लाइन 5 सुरू होताच भिवंडीतील नागरिकांना दिलासा मिळणार असून प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.

2017मध्ये मान्यता

मेट्रो लाइन 5 या प्रकल्पाला 2017मध्ये एमएमआरडीएने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर 2018मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर 2020मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरूवात झाली. पण आता 6 वर्ष उलटून गेले असले तरी अजून काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. पण आता पहिल्या टप्प्याचं काम लवकरच पूर्ण होण्याची शक्यता असली तरी दुसऱ्या म्हणजे कल्याणपर्यंत टप्प्याचं काम अजून सुरूही झालेलं नाही. त्यामुळे, संपूर्ण मेट्रो लाइन 5 सुरू होण्यासाठी नागरिकांना आणखी काही वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *