वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय. झोपडपट्टी भागातल्या औद्योगिक पट्ट्याच्या पुनर्विकासासाठी MIDCनं काढलेल्या निविदांवर वन मंत्री गणेश नाईकांनी आक्षेप घेतलाय. त्यामुळं पुन्हा एकदा गणेश नाईक शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय.
सरकारनं 2011 पर्यंतच्या झोपडपट्टी धारकांना दिलासा देण्याचा निर्णय घेत, त्या नियमित करण्याचे जाहीर केलं. पण, याच झोपडपट्टी भागातील औद्योगिक पट्ट्यातील 357 एकर पुनर्विकासासाठी MIDCनं निविदा काढल्याचं समोर आलं आहे. याच मुद्द्यावरुन आक्षेप घेत, आता गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे. असा मोठा प्रकल्प राबवायचा आणि भरपूर पैसे जमा करायचे असा हा डाव होता, असा आरोपही नाईक यांनी यावेळी केला. या विरोधात मंत्रिपद बाजूला ठेवून रस्त्यावर उतरण्याचा इशारा गणेश नाईकांनी दिला आहे.
या निविदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून काढल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला खरा, पण आता शिंदेंच्या शिवसेनेनं नाईकांवर पलटवार केला. नाईकांना उशिरा जाग आल्याचं टोला लगावत, खासदार नरेश म्हस्केंनी उपमुख्यमंत्री शिंदेंनी या निविदा रद्द करण्याचे आदेश दिल्याचं स्पष्ट केलं आहे.
