नातीच्या बर्थडे पार्टीहून परतताना काळाचा घाला! मद्यधुंद बँक व्यवस्थापकाच्या कारनं चिरडलं, आजी-आजोबाचा मृत्यू

मद्यधुंद बँक व्यवस्थापकाने बेदरकार कार चालवल्याने एका दाम्पत्याचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना बेसा परिसरात घडली. विजय भगवान सावरकर (वय ५३) व सुरेखा विजय सावरकर (वय ४८, रा. हरीहरनगर, बेलतरोडी), अशी मृतांची नावे आहेत. पंकज बाळकृष्ण डेकाटे (वय ४७, रा. न्यू नरसाळा, हुडकेश्वर), असे कारचालकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, विजय यांचे जावई नितीन सुरेश कळंबे (वय ३०) दिघोरीतील आराधनानगर येथे राहतात. बुधवारी नितीन यांच्या मुलीच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आराधनानगरमधील आहान सेलिब्रेशन हॉल येथे होता. सावरकर दाम्पत्य कार्यक्रमाला गेले. मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपून ते एमएच ४० एक्स ४५०६ क्रमांकाच्या मोपेडने घरी जात होते.

बेसा चौक ते पुरुषोत्तम बाजार चौकदरम्यान डेकाटे हा एमएच ४९ बीडब्ल्यू ४२२६ क्रमांकाची कार भरधाव वेगाने चालवीत येत होता. तो मद्यधुंद होता. याचदरम्यान डेकाटे याच्या मोबाइलवर कोणीतरी संपर्क साधला. त्याने मोबाइल बघितला. यादरम्यान त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची भरधाव कार समोरून येत असलेल्या मोपेडवर आदळली. यात मोपेडवरील सावरकर दाम्पत्य खाली पडून जखमी झाले. कार व मोपेडचा समोरील भाग चक्काचूर झाला. अपघातानंतर डेकाटे हा तेथून पळाला. काही अंतरावर लपला.

माहिती मिळताच बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद कवाडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी शोध घेऊन डेकाटे याला अटक केली.

तर दुसऱ्या एका घटनेत, केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने लातूरवरून केजच्या दिशेने प्रवास करीत होते. कारमध्ये ते एकटेच होते. रेणापूर फाट्याजवळ वळणावर कारवरील त्यांचे नियंत्रण सुटून कार पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेऊन त्यांचा मृतदेह रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *