किल्ले रायगडाला वणव्याचा विळखा, हिरकणी वाडीपासून महादरवाजापर्यंत वणवा, जल आणि विद्युत वाहिन्या जळून खाक

ऐन उन्हाळ्यात उष्णतेची तीव्रता वाढत असताना वन खात्याच्या राखीव वनक्षेत्रात तसेच खाजगी जागांमध्ये देखील वणवे लागून वनसंपत्ती नष्ट होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असं असतानाच गुरुवारी (9 एप्रिल) छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडाला देखील लागलेल्या वणव्यामुळे रायगड किल्ल्यावर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या तसेच विद्युत केबल देखील अनेक ठिकाणी जळून नष्ट झाल्या आहेत. मात्र सर्व काही नष्ट झाल्यानंतरच वन खात्याचे अधिकारी वणवा विझवण्यासाठी रायगड किल्ल्यावर दाखल झाले.

रायगड जिल्ह्यातील सर्व डोंगर माथ्यांवर जानेवारी महिन्यापासूनच वणवे लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आत्तापर्यंत सर्वच डोंगर माथ्यावरील वनसंपदा जळून नष्ट झाली आहे. असाच प्रकार आज छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर दुपारच्या सुमारास घडला. अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्यामुळे किल्ले रायगडावर पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या या प्लॅस्टिकच्या होत्या, त्या जमिनी खाली एक ते दीड फूट खोदून जमिनीत पुरणे आवश्यक असताना देखील ठेकेदाराने त्या उघड्यावर ठेवल्याने आज वणव्याच्या भक्षस्थानी पडल्या. त्याच पद्धतीने विद्युत केबल देखील उघड्यावर ठेवल्याने त्या देखील काही ठिकाणी आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे पाहण्यास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *