एकीकडे आपण २१ व्या शतकातील प्रगत महाराष्ट्राच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे बालविवाहाचा विळखा अद्यापही सुटलेला नाही, हीच भीषण वास्तविकता समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली असून, अवघ्या १४ वर्षांच्या एका चिमुरडीने लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच मृत्यूला कवटाळले आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून, “कायद्याचा धाक उरलाय की नाही?” असा सवाल आता विचारला जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
मंगळवेढा तालुक्यातील बावची आणि निंबोणी परिसरातील ही दुर्दैवी घटना आहे. अवघ्या १४ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचा चार महिन्यांपूर्वी बालविवाह लावून देण्यात आला होता. खेळण्या-बागडण्याच्या वयात या मुलीच्या खांद्यावर संसाराचं ओझं टाकण्यात आलं. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच सासरच्या मंडळींनी तिची छळवणूक सुरू केली.
सासरचा छळ आणि टोकाचं पाऊल
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या १४ वर्षीय नवविवाहितेचा सासरी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. ज्या वयात शिक्षणाची स्वप्नं पाहायची, त्या वयात तिला सासरच्या जाचाला सामोरे जावे लागले. अखेर या जाचाला कंटाळून तिने आपली जीवनयात्रा संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेच्या वृत्ताने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ती अन् सासरे गजाआड
या घटनेची गंभीर दखल मंगळवेढा पोलिसांनी घेतली आहे. मुलीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत पीडित मुलीचा पती आणि सासरा यांना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ते म्हणजे १४ वर्षांच्या मुलीचा बालविवाह झालाच कसा? गावातील जबाबदार नागरिकांना याची माहिती नव्हती का? एका कोवळ्या जीवाची आहुती दिल्यावरच यंत्रणा जागी होणार का? बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे असूनही, छुप्या पद्धतीने होणारे हे विवाह कोवळ्या मुलींच्या जीवावर बेतत आहेत.
