कोकणातल्या नव्हे, लातूरच्या आंब्याची किंमत किलोमागे तीन लाख रुपये; सगळे हैराण!

अनेकदा दुष्काळाचीच वृत्त समोर येणाऱ्या लातूर जिल्ह्या आता शेतीचा चेहरामोहरा बदलताना दिसत आहे. पारंपरिक शेतीला छेद देत, इथल्या एका शेतकऱ्याने असा प्रयोग केला आहे. ज्याची चर्चा आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे. या शेतकऱ्याच्या शेतात पिकणारं हे फळ इतकं खास आहे, की त्याची किंमत ऐकली तर कुणाचाही विश्वास बसणार नाही. कारण, ही किंमत हजारो नव्हे… लाखोंमध्ये मोजावी लागत आहे. यामागे वर्षानुवर्षांची मेहनत, धाडस आणि मोठं स्वप्न आहे. ज्यामुळं दुष्काळाशी झुंज देणाऱ्या लातूरमध्ये आता ही ‘हायटेक शेती’ आशेचा किरण ठरत आहे.

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील तांबाळा गावातील शेतकरी नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे यांनी आपल्या 30 एकर क्षेत्रावर तब्बल 12 हजार केसर आंब्याची लागवड केली आहे.  याच लागवडीमध्ये त्यांनी जपानमधील प्रसिद्ध ‘मियाझाकी’ आंब्याची काही झाडंही लावली. जगातील सर्वात महागड्या आंब्यांपैकी एक मानला जाणारा हा आंबा. त्याच्या आकर्षक गडद लाल रंगामुळे आणि गोड चवीमुळे ओळखला जातो. विशेष म्हणजे, या आंब्याची रोपं थेट परदेशातून विमानाने आयात करून चार वर्षांपूर्वी लागवड करण्यात आली. आधुनिक पद्धती, योग्य नियोजन आणि विशेष निगा राखत, शेतकऱ्यांनी ही लागवड यशस्वी केली. आता ही झाडं फळधारणेच्या टप्प्यात आली आहेत.

या मियाझाकी आंब्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत…

आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत तब्बल दोन ते तीन लाख रुपये प्रति किलो इतकी असल्याचं सांगितलं जातं. गडद लाल रंग, अतिशय गोड चव आणि उच्च दर्जा. यामुळे या आंब्याला जगभरात मोठी मागणी आहे. दरम्यान, शेतकरी नरसिंग लंगोटे यांनी 30 एकर क्षेत्रावर केलेल्या केसर आंब्याच्या लागवडीतून वर्षाला तीन ते चार कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न घेतलं आहे. याच बागेत प्रयोग म्हणून लावण्यात आलेल्या मीयाझाकी आंब्याचं उत्पादन स्वतंत्र असून भविष्यात यामधूनही मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. म्हणूनच लातूरमधील हा प्रयोग शेती क्षेत्रासाठी एक नवा आदर्श ठरताना दिसतोय.

लातूरची ओळख बदलतेय… 

निलंगा तालुक्यातील तांबाळा गावातील शेतकरी नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे ऊर्फ बिराजदार यांनी केसर आंब्याच्या मोठ्या बागेसोबतच जपानमधील मीयाझाकी आंब्याचीही यशस्वी लागवड करून दाखवली आहे. पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत. लाखोंची नव्हे तर कोटींच्या उत्पन्नाचा मार्ग त्यांनी शोधला आहे. यातूनच दिसून येतं, की योग्य नियोजन, धाडस आणि नव्या प्रयोगांची तयारी असेल तर दुष्काळी भागातही शेती फायदेशीर ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *