कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीत संकेश्वरी मिरचीने अक्षरशः इतिहास रचला आहे. प्रति किलो तब्बल 1900 रुपयांचा उच्चांक गाठत या मिरचीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. अवकाळी पावसामुळे सर्व प्रकारच्या मिरचीचे उत्पादन घटल्यामुळे मिरच्या अधिक महाग झाल्या आहेत. या वाढलेल्या दरामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत असले तरी दुसरीकडे ग्राहकांना या ‘तिखट’ दरांचा फटका बसताना दिसतो.
संकेश्वरी मिरचीचे दर सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर
वाढती महागाई आणि रोजच्या गरजांच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यात आता मिरच्यांचे भाव गगनाला भिडल्यामुळे ‘किमान चटणी-भाकरी तरी खायला मिळेल का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. संकेश्वरी मिरचीचा दर यंदा 1600 ते 1800 रुपये किलो झाला आहे. गेल्या वर्षी हाच दर 1200 ते 1500 रुपये किलो दर होता. अस्सल ब्याडगीचा दर 800 ते 950 रुपये किलो वर पोहचला आहे. गेल्या वर्षी हाच दर 380 ते 450 किलो होता. आंध्रप्रदेश जवारी मिरची – 350 ते 400 रुपये किलो आहे , हाच दर मागच्या सीजन मध्ये 200 ते 220 किलो इतका झाला आहे. लवंगी मिरचीचा दर 350 रुपये ते 400 रुपये किलोच्या दरम्यान आहे. हाच दर गेल्यावर्षी 200 ते 250 किलो इतका होता. काश्मिरी मिरचीचा दर 550 ते 600 रुपये किलो होता, तोच दर आता 950 ते 1100 रुपयावर पोहचला आहे.
नागरिकांच्या स्वयंपाकघरावर या दरवाढीचा मोठा परिणाम
मिरच्यांचे हे सर्व दर पाहता यंदा दर दुप्पट झाल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरावर या दरवाढीचा मोठा परिणाम झाला आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मिरचीच्या ‘तिखट’ दरांचा आणखी एक झटका बसला आहे. मिरच्यांचे सर्वाधिक उत्पादन आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यात घेतले जाते. याचबरोबर गडहिंग्लज, आजरा तालुक्यासह सुमारे 15 गावांमध्ये संकेश्वरी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. देशी वाणाची ही मिरची चवीला अत्यंत तिखट असून तिची पावडर दीर्घकाळ टिकते. त्यामुळे मुंबई, पुणे, कोकण आणि गोवा या भागातून या मिरचीला मोठी मागणी असते. मात्र ऑक्टोबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. त्यामुळेच बाजारात आवक कमी झाली आणि दरात मोठी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
ग्राहकांना दरवाढीचा फटका, शेतकरी मात्र खुष
एकीकडे ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसत असला, तरी संकेश्वरी मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा दिलासादायक क्षण ठरला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी शिवाप्पा आरबोळे यांना यंदा त्यांच्या मालाला विक्रमी दर मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे. शेतमालाला योग्य दर मिळणे गरजेचे असले, तरी दुप्पट दरवाढीमुळे ग्राहक मात्र अडचणीत सापडले आहेत. उत्पादन घट हेच या दरवाढीमागील प्रमुख कारण असून, पुढील हंगामात उत्पादन वाढल्यासच दर स्थिर राहण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मात्र ही ‘तिखट’ दरवाढ सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरणार आहे.
