संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शहरातील एमआयडीसी वाळूज परिसरात हॉटेलच्या आडून सुरू असलेला देहविक्रयाचा मोठा अड्डा गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केला आहे. कामगार चौक येथील ‘नंदिनी हॉटेल’ मध्ये सुरू असलेल्या या काळ्या धंद्यावर पोलिसांनी रात्री उशिरा धाड टाकली. या कारवाईत हॉटेल मॅनेजरसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, 5 पीडित महिलांची या विळख्यातून सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाला गोपनीय माहिती मिळाली होती की, नंदिनी हॉटेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करून महिलांकडून देहविक्रय करून घेतला जात आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी रात्री एक बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पाठवला. तिथे सौदा निश्चित होताच पोलिसांनी सिग्नल मिळताच हॉटेलवर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मॅनेजर सचिन भगवान गोसावी वय 30, नितीन भगवान गोसावी वय 32 आणि हॉटेल मालक उमेश रावसाहेब आमले यांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. छाप्यात 3 ग्राहकांनाही ताब्यात घेण्यात आले असून, देहविक्रयासाठी आणलेल्या 5 पीडित महिलांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. त्यांची रवानगी आता सुधारगृहात करण्यात आली आहे.
कशी केली कारवाई?
पोलीस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एक बनावट ग्राहक पाठवून या घटनेता पर्दाफाश केला. साक्षीदारांच्या उपस्थितीत त्या बनावट ग्राहकाला विशिष्ट खुणा असलेल्या नोटा दिल्या आणि त्याला लॉजमध्ये पाठवले. या ग्राहकाने एका महिलेसाठी 1,500 रुपये दिले आणि त्याला एका खोलीत नेण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी लगेच लॉजवर छापा टाकला आणि मॅनेजर आणि हॉटेल मालकाला अटक केली.
शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला
दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पैठण रोडवरील चितेगाव परिसरात मोठी गळती लागली आहे. एअर व्हॉल्वमधून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू झाल्याने दुरुस्तीसाठी जायकवाडीहून होणारे पंपिंग तातडीने बंद करण्यात आले आहे. या बिघाडामुळे शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रक आता एक दिवसाने पुढे ढकलण्यात आले असून, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
