सकाळची धावपळ, ऑफिसला पोहोचायची घाई आणि काही क्षणांतच सगळं संपलं. पुण्यातल्या वानवडी परिसरात भरधाव पाण्याच्या टँकरने एका तरुण इंजिनिअर तरुणीचा जीव घेतल्याने शहर पुन्हा हादरलं आहे. ग्रेसिया डॅनियल इसा (वय २४, रा. केदारीनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास गंगा सॅटेलाइट परिसरातील नाल्यावरील पुलाजवळ हा अपघात घडला. ग्रेसिया ही खाजगी कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत होती आणि त्या दिवशी कामानिमित्त तिला लवकर ऑफिसला जायचे होते.
दुचाकीवरून जात असताना वळणावर भरधाव पाण्याच्या टँकरने तिच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ती खाली पडली आणि टँकरच्या चाकाखाली आल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत तिला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
