बीडचा पोलीस कर्मचारी बेपत्ता मुलीच्या शोधासाठी पुण्याला गेला, घरी येताच टोकाचं पाऊल; घटनेनं पोलीस दलात खळबळ

बीड शहरातील लोकाशा नगर परिसरातील एका पोलिस कर्मचाऱ्याने पुण्याहून परतल्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाळकृष्ण जायभाये असं 35 वर्षीय मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून ते माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे. बाळकृष्ण जायभाये यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे जायभाये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसंच या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, बाळकृष्ण जायभाये हे माजलगाव शहर पोलीस ठाण्यात अंमलदार म्हणून काम पाहात होते आणि नवीन मोंढा भागात त्यांची नियुक्ती होती. माजलगाव शहरातील एका बेपत्ता मुलीच्या शोधासाठी परवा बाळकृष्ण हे पुणे येथे गेले होते. संबंधित काम पूर्ण करून ते रात्री उशिरा पुण्यावरून घरी परतले होते. मात्र त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना आज पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यातील पोलीस दलातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. बाळकृष्ण जायभाये यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. बाळकृष्ण जायभाये यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले असावे, असा प्रश्न सध्या सबंध जिल्ह्यात उपस्थित केला जात असून त्यांना नेमका कोणाचा त्रास होत ज्यामुळे अशा कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदाराला असे टोकाचे पाऊल का उचलावे लागले, असे अनेक प्रश्न सध्या जिल्ह्यात उपस्थित केले जात आहेत. या आत्महत्येमागील नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *