दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तालुक्यातील चार शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच दिंडोरीत कार विहिरीत कोसळून इंदोरे येथील दरगोडे कुटुंबातील सहा विद्यार्थ्यांसह नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
वरखेडा येथील जनता विद्यालयात शिकणारे तीन विद्यार्थी मंगळवारी (दि. ७) सायंकाळी परमोरी येथे कादवा नदीत पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अदमास न आल्याने समीर रावसाहेब गांगोडे (वय १४) व यश राहुल पगारे (वय १२) या दोघांचा बुडून मृत्यू झाला. तिसरा सुदैवाने बचावला. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
दुसरी घटना निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे घडली. कारणाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील रुद्र गणेश जाधव (वय १३) व ओमकार सुनील फटांगडे (वय १३) हे दोघे मंगळवारी दुपारी दोन वाजता ओहळात अंघोळीसाठी गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दोघेही मोहाडी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. सायखेडा पोलिसांत नोंद करण्यात आली.
झोक्याचा फास लागून मुलाचा मृत्यू
दिंडोरी : तालुक्यातील कादवा म्हाळुंगी येथे मंगळवारी (दि. ७) सकाळी साडेअकराच्या सुमारास झोका बांधताना साडीचा गळफास बसून सुरज हिम्मत गायकवाड (वय १३) या मुलाचा मृत्यू झाला. सुरज झाडाला साडीचा झोका बांधत होता. यावेळी पाय घसरून तो पडला. यावेळी झोक्याची साडी त्याच्या गळ्यात अडकल्याने त्याला फास बसला. यात त्याचा मृत्यू झाला. उपनिरीक्षक अल्ताफ शेख व भरत कनोज पुढील तपास करत आहेत.
