यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, जून ते सप्टेंबर ‘एल निनो’चा फटका; ‘स्कायमेट’च्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली

राज्यात अवकाळी पावसाच्या हजेरीनंतर पुन्हा उन्हाचा चटका वाढला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई शहरांत दिवसभर ढगाळ वातावरण असून कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पण, एका खासगी हवामान एजन्सी, स्कायमेटच्या अहवालामुळे शेतकरी आणि सर्व नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.

दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होणार?

गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यंदा शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा होती. पण स्कायमेटच्या या अहवालानंतर चिंता वाढली आहे. मान्सूनच्या सुरूवातीलाच ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे हवामानामध्ये मोठे बदल घडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचे त्यांच्या अभ्यासात दिसून आले आहे. यामुळे देशभरात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण होण्याची 30 टक्के शक्यता असल्याचा अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रशांत महासागरातील मध्य आणि पूर्वेकडील पुष्टभागाचे तापमान वाढत चालले आहे. यामुळे एल निनो तयार होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम भारतातील मान्सूनवर होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. त्याचवेळी हिंदी महासागरातील इंडियन ओशन डिपोल (IOD) मुळे एल निनोची तीव्रता कमी जाणवण्याची शक्यता असल्याचीही माहिती स्कायमेटने यावेळी दिली. आयोडीमुळे जूनच्या सुरूवातीला मान्सूनसाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे देशातील अनेक भागांत ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम भारातात परिणाम दिसून येऊ शकतो.

‘आयएमडी’च्या अहवालाची प्रतीक्षा

दरम्यान, पूर्वेत आणि ईशान्येत एल निनोचाय परिणाम कमी जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांमध्ये संपूर्ण मान्सून चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतू, भारतीय हवामान विभागाने अद्याप याबद्दल काही माहिती जाहीर केली नाही आहे. पण या आठवड्यापर्यंत आयएमडी अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार सरासरीहून कमी पाऊस पडण्याची 40 टक्के शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *