हस्तरेषातज्ज्ञ असल्याचे भासवून भोंदूगिरी करणाऱ्या संशयित रवींद्र एरंडे याने त्याच्या ‘टॅब’मध्ये असलेल्या आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओबाबत पोलिसांसमोर धक्कादायक दावा केला. ‘माझ्या मैत्रिणींसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ आहेत’, असे एरंडेने पोलिसांना सांगितले असून, त्याने खंडणीच्या फिर्यादीतही त्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे फोटो, व्हिडीओ साठवून लैंगिक शोषण किंवा खंडणी उकळण्याचा प्रयत्न एरंडे करीत होता का, यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत.
काय आहे प्रकरण?
भोंदू अशोक खरातप्रमाणेच संशयित रवींद्र एरंडे यानेही महिलांना विविध स्वरूपाचे आमिष दाखवत भोंदूगिरी केल्याचे उघड झाले आहे. एरंडेच्या कार्यालयातून पोलिसांनी सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी जप्त केली. आक्षेपार्ह व्हिडीओवरून चौघांनी खंडणी उकळल्याचे सांगत स्वतःचे पाप लपविणाऱ्या रवींद्र एरंडेचे लैंगिक अत्याचाराचे बिंग त्याच्याच ‘ऑफिस बॉय’ने रचलेल्या सापळ्यामुळे फुटले. सातपूर पोलिसांनी संशयित एरंडेला अत्याचारासह ॲट्रोसिटीच्या गुन्ह्यात अटक केली. एरंडेच्या पोलिस कोठडीत सत्र न्यायालयाने १० एप्रिलपर्यंत वाढ केली.
ऑफिस बॉयमुळे पर्दाफाश
‘ऑफिस बॉय’ने मालकाच्या गैरकृत्यांचा भांडाफोड करून बारा लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. एरंडेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी खंडणीखोरांना अटक केली होती. या फिर्यादीमध्येच एरंडेने स्वतःचे गैरकृत्य एकप्रकारे मान्य केले आहे. कारण, खंडणीच्या फिर्यादीत ‘मैत्रिणीसोबतचे विवस्त्र खासगी फोटो व व्हिडीओ असा डाटा एका टॅबमध्ये सेव्ह करून तो ऑफिसमध्येच ठेवला होता’, असा उल्लेख एरंडेने केला. दरम्यान, पोलिसांनी जप्त केलेल्या ‘डीव्हीडी’मध्ये त्याचेच शंभर आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ सापडले.
