मिसिंग लिंकवर ‘लोड टेस्टिंग’ सुरू, मार्ग आता अंतिम टप्प्यांत; मे महिन्यापर्यंत काम पूर्ण

मुंबई-पुणे मिसिंग लिंक हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शेवटच्या टप्प्यात आहे. हा बहुप्रतिक्षित मार्ग येत्या मे महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा असून सध्या या मार्गावर लोड टेस्टिंग सुरू झालं आहे. सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण होताच हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबईतून पुण्याकडे जाणाऱ्या आणि पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लवकरच काम पूर्ण

मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे दोन्ही भाग जोडले गेले आहेत. खोल खाडीवर उभारलेल्या या केबल-स्टेड पुलावर वाहतुकीची नियमित चाचणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्याच्या दिशेने येणाऱ्या दोन्ही पुलांवर कामं पूर्ण झाली आहेत. हा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून एप्रिलअखेरपर्यंत काम संपवण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट आहे.

खोपोली आणि कुसगावदरम्यान, हा संपूर्ण 13.3 किमी लांब मार्ग उभारण्यात आला आहे. लोणावळा आणि खंडाळा घाटादरम्यान होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा मार्ग उभारण्यात आला आहे. मिसिंग लिंक सुरू होताच मुंबई ते पुणेदरम्यान प्रवास 25 ते 30 मिनिटांत होणार आहे. पावसाळ्यातही काम सुरू ठेवल्यामुळे वेळेत काम संपवता आले अशी माहिती वरिष्ठ अधिकारी अनिल गायकवाड यांनी फ्री प्रेस जरनलशी बोलताना दिली आहे.

किरकोळ कामं शिल्लक

मिसिंग लिंकच्या मार्गावर सध्या दोन जुले बोगदे आणि एका मोठा केबल-स्टेड पूलाचा समावेश आहे. रस्त्याचं काम नुकतच पूर्ण झाल्यामुळे आता लोड टेस्टींग म्हणजेच, भार तपासणीचं काम सध्या सुरू करण्यात आलं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अवजड वाहानांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहतूककोंडीसह अनेकवेळा अपघातही होतात. त्यामुळे हे पूल सर्व अवजड वाहनांचा भार उचलण्यासाठी सक्षम आहेत याची तपासणी करणं गरजेचं आहे. याशिवाय सध्या मार्गावर दिशादर्शक फलकं, बॅरिअर आणि पेंटिंगसारखी किरकोळ कामं बाकी आहेत.

दरम्यान, मिसिंग लिंक खुला होताच सुरुवातीच्या तीन महिन्यांसाठी फक्त हलक्या वाहनांना मार्गावर वाहतुकीची परवानगी असणार आहे. त्यापुढील तीन महिने अवजड आणि प्रवासी वाहनांना परवानगी दिली जाईल. सहा महिने वाहतुकीचा प्रवाह तपासल्यानंतर व्यावसायिक वाहनांच्या परवानगीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *