मणिपूरमध्ये पुन्हा भडका! बॉम्बहल्ल्यात दोन मुलांचा मृत्यू, पाच जिल्ह्यांत इंटरनेट बंदीसह संचारबंदी लागू

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाचे लोण पसरले आहेत. विष्णुपूर जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री एका घरावर झालेल्या बॉम्बहल्ल्यात एका पाच वर्षांचा मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला, तर त्यांची आई जखमी झाली आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत ठिकठिकाणी निदर्शने केली. तणाव वाढल्यामुळे चार जिल्ह्यांत संचारबंदी आणि पाच जिल्ह्यांत इंटनेट सेवा बंद करण्यात आली.

परिसरातील पेट्रोल पंपाजवळील दोन ते तीन टँकर आणि ट्रकला आग लावण्यात आली. मोइरांग पोलिस ठाण्यासमोर टायर जाळण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात उभी केलेली पोलिस चौकी उद्ध्वस्त करण्यात आली. संतप्त नागरिकांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यासाठी इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील पांगेई आणि खुराई येथे आणि इम्फाळ पश्चिममधील लंगथाबल येथे वाहनांची वाहतूक थांबवली. रस्त्यांमध्ये टायर जाळले.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री वाय. खेमचंद सिंह यांनी हल्ल्याचा निषेध केला. ‘हे क्रूर कृत्य आहे. यास जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल,’ असे ते म्हणाले. ‘हा मानवतेवरील हल्ला असून मणिपूरमध्ये कष्टाने मिळवलेली शांतता बिघडवण्याचा थेट प्रयत्न आहे.

कोणत्याही परिस्थिती हे दहशतवादी कृत्य सहन केले जाणार नाही,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या दोन मुलांच्या जखमी आईची खासगी रुग्णालयात भेट घेतली. मोइरांग ट्रोंग्लाओबी चुराचंदपूरच्या डोंगराळ भागाजवळ आहे. २०२३ आणि २०२४मध्ये मैतेई आणि कुकी-झो गटांमधील वांशिक संघर्षादरम्यान येथे सातत्याने गोळीबार झाला होता.

मंगळवारी ट्रोंगलाओबीच्या जवळच्या परिसरातून एक स्फोटक उपकरणही जप्त करण्यात आले, असे आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, ‘ सीआरपीएफ तळावर आंदोलकांनी प्रवेश करू नये. बॉम्बहल्ल्यात सामील असलेल्या आरोपींना पकडण्यासाठीच्या मोहिमेवर सुरक्षा दलांना लक्ष केंद्रीत करू द्यावे, अशी विनंती मी केली होती, परंतु आंदोलकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांनी तळावर हल्ला करत नासधूस केली. परिणामी सुरक्षा दलांनी गोळीबार केला,’ असे गृहमंत्री कांथौजम म्हणाले.

एनआयएकडे तपास
या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे खेमचंद यांनी सांगितले. राज्याचे गृहमंत्री आणि इतर आमदारांशी विस्तृत चर्चा केल्यावर हा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले. हल्लेखोरांची अद्याप ओळख पटलेली नाही. व्यापक प्रमाणात धरपकड सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

तीन दिवस इंटरनेट बंद
या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मणिपूरमधील इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग, विष्णूपूर या पाच जिल्ह्यांत ब्रॉडबँड, व्हीसॅट, व्हीपीएनसह इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश मणिपूर सरकारने मंगळवारी प्रसृत केले.

सीआरपीएफ तळावर हल्ला; दोन ठार
हा बॉम्बहल्ला झालेल्या ठिकाणाहून जेमतेम १०० मीटर अंतरावर विष्णुपूर जिल्ह्यात आंदोलकांनी गेलमोजवळील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर हल्ला केला. यानंतर झालेल्या गोळीबारात दोन जण ठार आणि २० जण जखमी झाले, अशी माहिती मणिपूरचे गृहमंत्री गोविंदास कांथौजम यांनी मंगळवारी दिली. तसेच येथील मालमत्तांचेही आंदोलकांनी वाहने जाळली आणि नुकसान केले.

तीन दिवस इंटरनेट बंद
या घटनेच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने मणिपूरमधील पाच जिल्ह्यांत ब्रॉडबैंड, व्हीसॅट, व्हीपीएनसह इंटरनेट सेवा बंद करण्याचे आदेश मणिपूर सरकारने मंगळवारी प्रसृत केले. गृह आयुक्त एन. अशोक कुमार यांनी याबाबतच्या आदेशावर स्वाक्षरी केली. इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग, विष्णूपूर या पाच जिल्ह्यांत तीन दिवसांसाठी ही बंदी असेल.

चार जिल्ह्यांत संचारबंदी

बॉम्बस्फोटात दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर उसळलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मणिपूर सरकारने मंगळवारी इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम, विष्णूपूर आणि काकचिंग जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘७ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही व्यक्तीच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येत आहे,’ असे आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *