बईच्या भाऊचा धक्का येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गदरम्यानची रो-रो प्रवासी सेवा सुरू होऊन महिना उलटल्यावर लागलीच तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची वेळ आली आहे. समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनात बिघाड झाल्याने प्रवासी सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला.
सहाव्या फेरीदरम्यान तांत्रिक बिघाड
१ मार्चपासून ‘एमटूएम फेरीज प्रा. लि. कंपनी’कडून ‘एम२एम प्रिन्सेस’ या जहाजाद्वारे मुंबई-विजयदुर्ग सेवा सुरू करण्यात आली. या सेवेमुळे मुंबईहून विजयदुर्गदरम्यानचे अंतर अवघ्या सहा ते सात तासांत पार करणे शक्य झाले होते. प्रवाशांचाही याला उदंड प्रतिसाद लाभला. महिनाभरात सेवेच्या एकूण सहा फेऱ्या पूर्ण झाल्या, मात्र सहाव्या फेरीदरम्यान विजयदुर्गहून मुंबईकडे परत येताना समुद्रातील तरंगत्या कचऱ्यामुळे जहाजाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाला.
जहाजातील चार इंजिनांपैकी सध्या केवळ एकच इंजिन कार्यरत असून उर्वरित तीन इंजिनांच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग परदेशातून मागविण्यात आले आहेत. मात्र, पश्चिम आशियातील युद्ध परिस्थितीमुळे या भागांच्या पुरवठ्यात विलंब होत असल्याचे सांगण्यात आले. अंदाजे १५ दिवसांत हे सुटे भाग उपलब्ध होतील. त्यानंतर दुरुस्तीसाठी आणखी १० दिवस लागण्याची शक्यता आहे, असे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केले. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणांकडून ‘एम२एम प्रिन्सेस’ची तपासणी केली जाईल. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड होऊ नये, यासाठी नियमांचे काटेकोर पालन करून दुरुस्तीचे काम सुरू आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.
महिन्याभरात सेवा बंद
मुंबईतून कोकणापर्यंत सहजपणे आणि जलद प्रवासासाठी ही रो-रो सेवा सुरू करण्यात आली होती. या फेरीमुळे मुंबई ते विजयदुर्ग प्रवासाचा वेळ कमी झाला. शिमग्याला कोकणात जाणाऱ्या नागरिकांना फायदा होईल या कारणाने 1 मार्च रोजी ही सेवा सुरू करण्यात आली खरी पण महागड्या दरांमुळे कोकणवासियांनी फेरीकडे पाठ फिरवली होती. या बोटीची प्रवासी क्षमता 626 असली तरी तिकीट दरांमुळे महिन्याभरात प्रवासी संख्या खूप कमी नोंदवली गेली आहे.
