मुंबईतील ॲक्वा मेट्रोतही प्रेमी युगुलांचे चाळे; सुरक्षा कंत्राटी पद्धतीवर असल्याचे धक्कादायक वास्तव!

मुंबईतील पहिल्याच भूमिगत आणि तितक्याच संवेदनशील मेट्रो-३ म्हणजेच ॲक्वा मेट्रोची सुरक्षा कंत्राटी पद्धतीवर असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. पोलिसांप्रमाणेच काम, तितकीच जोखीम आणि जबाबदारी असतानाही कंत्राटी पद्धतीवर राबवून घेतले जात असल्याने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (मसुब) जवानांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यातच कर्तव्यवाटपातील विषमता, बदल्या आणि कंत्राटी नियुक्ती यांमुळे गैरहजेरीचे प्रमाण अधिक असून त्याचा ताण इतरांवर पडतो. मेट्रो-३मध्ये तर अधिकाऱ्यांनाही जवानांचे काम करावे लागते. अशा अनागोंदीमुळे अनेकांची या ठिकाणी कर्तव्य बजावण्याची मानसिकताच नसल्याचे चित्र ‘मसुब’मध्ये दिसते.

मेट्रो स्थानकांच्या प्रवेशद्वारावर कोणतीच सुरक्षा नसतानाच, तपासणी केंद्रांवर महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे जवानही कंत्राटी आहेत. मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर संवेदनशील ठिकाणे, आस्थापना यांच्या सुरक्षेचा भार पोलिसांवर पडत असल्याने, राम प्रधान समितीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या धर्तीवर महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना करण्याची शिफारस केली. मात्र तसे न करता सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करून त्याअंतर्गत महाराष्ट्र सुरक्षा बलाची निर्मिती केली. सुमारे दहा हजार जवान यामध्ये कार्यरत असून स्थापनेपासून हे सर्व कंत्राटावर काम करीत आहेत.

मसुब’मध्ये सुरक्षा अधिकारी, साहाय्यक सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, मुख्य सुरक्षारक्षक आणि सुरक्षारक्षक असा पदक्रम आहे. इतर आस्थापनांमध्ये सहाय्यक सुरक्षा अधिकारी हा तेथील प्रभारी अधिकारी आहे. मात्र मेट्रो-३मध्ये या अधिकाऱ्याला प्रसंगी सुरक्षारक्षकाचे काम करावे लागते. अनेक मेट्रो स्थानकांवर सुरक्षारक्षक ते थेट साहाय्यक सुरक्षा अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे. सुरक्षा पर्यवेक्षक, मुख्य सुरक्षारक्षक या पदावर कोणीही नसल्याने त्यांची कामेदेखील अधिकाऱ्यांनाच करावी लागतात. चारपैकी एका सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्याला २७ पैकी एका स्थानकावर कधीही कर्तव्य बजावण्यास धाडले जाते. एक दिवस गैरहजर राहिल्यास वरिष्ठ अधिकारी ज्या स्थानकावर असतील त्या ठिकाणी जाऊन हजर व्हावे लागते. कर्तव्यवाटपात ही विषमता असल्याने अनेक अधिकारी बदलीच्या मानसिकतेत आहेत, मात्र बदल्यांमध्येही आर्थिक गणित असल्याचा त्यांचा आरोप आहे.

बेवारस वस्तू, अश्लील चाळे

एका स्थानकावर अधिकारी आणि जवान मिळून ४० ते ४५ जण नेमणुकीला असतात. तीन पाळ्यांमध्ये ही संख्या अपुरी असल्याने तपासणी केंद्र सोडून स्थानकाच्या इतर ठिकाणी कायम बंदोबस्त ठेवता येत नाही, केवळ अधूनमधून गस्त घातली जाते. प्रवेशद्वारापासून ते तपासणी केंद्रापर्यंतच्या निर्मनुष्य आणि शुकशुकाट असलेल्या भागात कुणीही काहीही वस्तू ठेवून जातात. दिल्ली मेट्रोप्रमाणे या ठिकाणीदेखील प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे सुरू असतात.

आरोग्याच्या तक्रारींत वाढ
‘मसुब’च्या जवानांना आठ तास ड्युटी करावी लागते. मात्र मेट्रो भूमिगत असल्याने आतमध्ये सूर्यप्रकाश नाही, वातावरण कोंदट असते. एसीशिवाय आत बसणे अशक्य असते आणि इतके तास एसीदेखील अनेकांना सहन होत नाही. त्यामुळे मेट्रो-३ येथे नेमणुकीला असलेले ‘मसुब’चे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्याचे येथील अधिकारी सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *