अमरावती-अकोला महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसंच तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बेलोरा विमानतळ परिसरात घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व युवक उशिरा अंदाजे रात्री 11 वाजता बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबले होते. चहा घेऊन परत जात असताना त्यांच्या चारचाकी वाहनाला भरधाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळत आहे.
कारमध्ये 7 जण; 4 ठार, 3 गंभीर जखमी
अपघाताच्या वेळी कारमध्ये एकूण सात जण होते. भरधाव ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारमधील चार युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तात्काळ रीम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यापैकी एका जखमी तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
ट्रक चालक फरार; सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे.
अपघातातील मृतांची नावे :
मोहम्मद अनस मोहम्मद सईद (20)
मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (22)
मोहम्मद अवेज मोहम्मद सईद (26)
अब्दुल अन्वेस अब्दुल सलीम (22)
दरम्यान, अपघातग्रस्त कारमधील हे सर्व युवक बडनेरा येथील जुनी बस्ती परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आलं असून या दुर्दैवी घटनेमुळे बडनेरा जुनी बस्तीमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झालं आहे. कुटुंबातील तरुण मुलं मृत्युमुखी पडल्याने नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
