लाडक्या बहि‍णींना दिलासा! ३० एप्रिलपर्यंत करु शकतात eKYC, आदिती तटकरेंची माहिती

लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी (eKYC) करण्याची शेवटची मुदत ३१ मार्च २०२६ रोजी म्हणजे काल संपली होती. पण आता लाडक्या बहि‍णींसाठी पुन्हा एकदा एक मोठी बातमी आहे. लाडक्या बहि‍णींना आता आपली ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ई-केवायसीची शेवटची मुदत ३० एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

काय आहे लाडकी बहीण योजना?

विधानसभा निवडणुकीआधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला १५०० रुपये निधी जमा करण्यात येतो. या लोकप्रिय योजनेचा फायदा महायुती सरकारला चांगल्या पद्धतीने झाला, जे आता आपल्यासमोर आहे. मात्र, या योजनेत बोगस लाभार्थीसुद्धा याचा फायदा घेत असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलं. फक्त आणि फक्त अडीच लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठीच असलेल्या या योजनेत भल्याभल्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलं. या चुकीच्या प्रकारांवर अंकुश लावण्यासाठी ई-केवायसीची संकल्पना अंमलात आणली गेली, आणि बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून गेट-आऊट करण्याची योजना आखली.

ई-केवायसीची मुदत वाढवली

त्यानुसार ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबर २०२५ची शेवटची मुदत देण्यात आली. मात्र, त्यादरम्यान देखील महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. नेमकं त्याचवेळी या संकेतस्थळात तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आणि बऱ्याच महिलांच्या ई-केवायसी करण्यापासून वंचित राहिल्या. तरीही १ कोटी ७० लाख महिलांना ई-केवायसी करण्यात यश आलं. मोठी बाब म्हणजे, अनेक महिलांनी कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत आहे किंवा नाही यासाठी देण्यात आलेल्या पर्यायांतून चुकीचा पर्याय निवडल्याने अनेक महिलांचा १५०० रुपयांचा हफ्ता आपोआप बंद झाला. दरम्यान, अशा महिलांच्या तक्रारीनंतर किंवा ज्यांची ई-केवायसी राहिलीय, अशा महिलांसाठी पुन्हा ३१ मार्च २०२६ची मुदत देण्यात आली, ती मुदत देखील काल मंगळवारी संपली. मात्र, त्याचदरम्यान, आता पुन्हा ही मुदतवाढ करुन ३० एप्रिल २०२६ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *