मुंबई विमानतळावरील IndiGo विमानात ‘ती’ एक धोकादायक चिठ्ठी सापडली, बॉम्ब शोधक पथक पोहोचलं अन् मग…

बुधवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे अंधेरी विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. इंडिगो फ्लाइट 911 आपल्या निर्धारित वेळेत उडण्यासाठी तयार होती. तेवढात विमानातील टॉयलेटमध्ये एक टिश्यू पेपरवर एका नोटमुळे एकच खळबळ माजली. त्या टिश्यू पेपरवर धोका असं लिहिलं होतं. त्यासोबत त्या टिश्यूवर धोकाचे संकेत असलेली मानवी खोपडीचे चित्र काढलं होतं. विमान उड्डाणसाठी तयार असताना ही घटना घडल्यामुळे एकच भीतीदायक वातावरण निर्माण झालं. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांना तात्काळ सतर्क करण्यात आले आणि हे प्रकरण गांभीर्याने घेऊन विमानाची तपासणी करण्यात आली. एवढंच नाही तर बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आलं.

तपासादरम्यान, शौचालय आणि विमानाच्या इतर भागांची कसून तपासणी करण्यात आली पण संशयास्पद काही सापडलं नाही. तपास पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आणि प्रवाशांमधील भीती इंडिगो कर्मचाऱ्यांनी दूर केली. ही घटना एखाद्या समाजकंटकाचे कृत्य असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अशा घटना हलक्यात घेता येणार नाहीत कारण त्याचा परिणाम प्रवाशांच्या आणि विमानतळाच्या सुरक्षेवर होतो, त्यामुळे हे प्रकरण गांभीर्याने घेऊन एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

टिश्यू पेपरवर ‘धोका’ कोणी आणि का लिहिलं, याचा शोध मुंबई पोलीस आता घेत आहेत. यासाठी मुंबई पोलीस संशयिताला ओळखण्यासाठी विमानतळावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपास आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, विमानतळावरील सर्व सेवा सुरळीतपणे सुरू असल्याचे इंडिगो कंपनीकडून सांगण्यात आलंय. या प्रकरणाचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *