मुंबई लोकलच्या मुलुंड रेल्वे स्थानकावर दोन शाळकरी मुलांचा वाद थेट रेल्वेच्या रुळांवर पोहोचला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका मुलीवरून सुरू झालेला या वादाचं रूपांतर हाणमारीत झालं असल्याची माहिती एक्स पोस्टमधून दिली गेली आहे. समोरून ट्रेन येत असतानाच ही दोन शाळकरी मुलं रुळांवर उतरून हाणामारी करायला लागल्यामुळे स्थानकावर भीतीचं वातावरण पसरलं होतं.
नेमकं काय घडलं?
यामध्ये हा वाद रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर सुरू झालेला दिसून येत आहे. काही क्षणातच या वादाचं रूपांतर हाणामारीत होत असून दोघे एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना दिसून येत आहेत. यावेळी एका मुलाचा तोल जाऊन तो थेट रेल्वे रुळांवर पडला. मुलुंड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1वर ही घटना घडली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.
दोघेही रुळांवर पडल्यावरही न थांबत त्यांनी भांडण सुरूच ठेवलं. यावेळी कोणतेही पोलिस, किंवा आरपीएफ आधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. शेवटी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी लोकल पाहून स्थानकांवरील नागरिकांनी मध्यस्थी केली. स्थाकावर प्रवासी “ट्रेन आ रही है” असे ओरडताना दिसत आहेत. परंतु, त्यांच्याकडे लक्ष न देताच ही पोरं एकमेकांचा गळा आवळून दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी काही नागरिक थेट रुळांवर उतरून त्यांचं भांडण सोडवण्यासाठी गेले.
