उन्हाळी सुट्ट्या असो किंवा मग जोडून आलेल्या सुट्ट्या असो, हल्ली अनेकांचीच पावलं कोकणच्या दिशेनं वळतात. काही मंडळी सुनियोजित बेत आखून किंवा काही मंडळी अगदी सहजपणे क्षणात बेत करून कोकणच्या वाटेवर निघतात. रस्ते मार्गानं जाण्यापेक्षा बरीच मंडळी कोकणचा हा प्रवास रेल्वेनं करण्यास प्राधान्य देतात. सध्याही याच कोकणात जाण्यासाठी अनेकांचीच लगबग सुरू आहे. कारण ठरतेय ती म्हणजे उन्हाळी सुट्टी.
शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागली आहे, काहींची सुट्टी येत्या दिवसांत सुरू होणार आहे तर नोकरदार मंडळींनाही जोडून आलेल्या सुट्ट्या आहेतच. ज्यामुळं कोकणात जाणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. मात्र या साऱ्यामध्ये रेल्वेचं नियोजन मात्र ढेपाळल्याचं दिसून येत आहे. सुट्ट्यांचा माहोल आणि त्यामुळं प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने काही विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली. मात्र या घोषणेला एक दिवस उलटत नाही तोच गाड्यांच्या नियोजनात बदल करण्यात आला.
विशेष गाड्यांची संख्या अचानक कमी
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव या मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांची संख्या अचानक कमी करण्यात आली. ज्यामुळं आता या मार्गावर 20 ऐवजी 18 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. ज्यामुळं आता प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे. मध्य रेल्वेनं जारी केलेल्या माहितीनुसार दर सोमवारी गाडी क्र. 01019/01020 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव साप्ताहिक विशेष गाडीच्या 20 फेऱ्या चालवल्या जाणार होत्या.
5 एप्रिल ते 7 जूनपर्यंतच्या कालावधीत रेल्वेच्या या विशेष गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत असतील असं रेल्वेनं जाहीर केलं. पण, नियोजनाचा पहिल्याच दिवशी चुराडा झाला. 3 ते 5 एप्रिलपर्यंत सलग सुट्टया आणि प्रवाशांची अपेक्षित गर्दी याचा अंदाज असतानाही याच काळातील दोन फेऱ्या मध्य रेल्वेने रद्द केल्या ज्यामुळं 5 एप्रिलच्या रविवारी प्रवाशांची गर्दी असण्याची शक्यता आहे.
सुधारीत वेळापत्रक जारी, पाहून घ्या
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडी क्र. 01019 या साप्ताहिक विशेष गाडीची सेवा 5 एप्रिलऐवजी आता 12 एप्रिलला सुरू होणार आहे. सुधारित वेळापत्रकातील माहितीनुसार 5 एप्रिल ते 7 जूनदरम्यान ही विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दर रविवारी 12 वाजून 55 मिनिटांनी सुटेल. मडगाव इथं ती दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी पोहोचेल. याच कालावधीत गाडी क्र. 01020 ही साप्ताहिक विशेष गाडी 12 एप्रिल ते 7 जूनदरम्यान मडगावहून दर रविवारी दुपारी 4 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दुसऱ्या दिवशी पहाटे 3. 50 वाजता पोहोचेल. त्यामुळं या बदललेल्या वेळापत्रकाचा अंदाज घेऊनच प्रवाशांनी पुढील प्रवासाची आखणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
