महावीर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुंबईतल्या जैन समुदायाच्या कार्यक्रमात जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई, छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी द्वितीय यांच्या आई महाराणी ताराराणी भोसले या जैन समाजाच्या असल्याचं वादग्रस्त विधान केलं. या विधानावरुन वादाला तोंड फुटलेलं असतानाच या कार्यक्रमात मंचावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.
जैन मुनी नेमकं काय म्हणाले?
जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी ऐतिहासिक संदर्भ देताना समाजावर कसा अन्याय झाला याबद्दल बोलतो होते. त्यावेळी त्यांनी, “औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला,” असं विधान केलं. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांसहीत अनेकांनी जैन मुनींच्या या विधानाचा उघडपणे विरोध केला आहे. ताराराणी हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या आणि मराठा स्वराज्याशी संबंधित होत्या, असं इंद्रजीत सावंत म्हणालेत.
एकनाथ शिंदेंनी साधा निषेधही केला नाही
“राज्याचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला मराठा समजतात त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराराणी यांचा वंश बदलण्याचा प्रयत्न केला गेला. या विधानाचा साध निषेध देखील त्यांनी व्यक्त केला नाही,” असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. तसेच पुढे बोलताना, “महाराणी ताराराणी या राजाराम महारांच्या पत्नी, हंबीरराव मोहिते त्यांच्या कन्या मग हंबीरराव मोहिते जैन होते का?” असा सवाल राऊतांनी विचारला आहे. एवढ्यावरच न थांबता राज्य सरकारला त्यांनी केलेल्या धर्मांतर कायद्याची आठवणही राऊतांनी करुन दिली आहे. “राज्यात वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तुम्हीच तर राज्यात धर्मांतर विरोधी कायदा आणला ना? मग आमच्या रातराणीचे धर्मांतर करण्याचा अधिकार कोणी दिला यांना? यावर कारवाई केलीच पाहिजे,” अशी मागणी राऊत यांनी केली आहे.
“फडणवीस यावर कारवाई करणार का?”
“फडणवीस यावर कारवाई करणार का?” असा सवाल राऊतांनी विचारला आहे. “एकनाथ शिंदे यांनी सर्वात आधी निषेध व्यक्त करायला पाहिजे होतं. त्यांना कदाचित ताराराणी माहिती नसेल,त्यांना कदाचित ताराबेन ऐकले असेल. फडणवीसांना वाटत नाही ताराराणीचा अपमान झाला आहे? फडणवीसांना, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि जरांगे पाटील यांना वाटतं नाही का हा ताराराणी यांचा अपमान आहे?” असा सवालही राऊतांनी उपस्थित केला. “मंगल प्रभात लोढा यांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती आहे का?” असा प्रश्नही राऊतांनी विचारला.
