‘सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदी बसाव्यात!’ बारामती पोटनिवडणुकीआधी कोणी केलं हे विधान? ‘CM पदी अजितदादांना..’

 बारामतीमध्ये पोटनिवडणुकीचं वातावरण असून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार असतील हे स्पष्टच आहे. भारतीय जनता पार्टीनेही ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासंदर्भातील आवाहन भाजपाकडून करण्यात आलं असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही उमेदवार दिला जाणार नाही. महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली असली तरी काँग्रेस उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. असं असतानाच आता सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवण्यात आली आहे. ही इच्छा नेमकी कोणी व्यक्त केली आहे आणि काय म्हटलं आहे जाणून घेऊयात…

कोणी व्यक्त केली ही इच्छा?

सुनेत्रा पवार पुढील दोन दिवसांमध्ये बारामतीमधून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार असतानाच दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील एका आमदाराने त्या मुख्यमंत्री व्हाव्यात असं म्हटलं आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी हे विधान केलं आहे. “राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुनेत्रा वहिनी बसाव्यात अशी माझ्यासह सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा असून आई एकवीरेच्या चरणी साकडं घातलं आहे,” असं सुनील शेळकेंनी म्हटलं आहे.

सुनील शेळके यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना, “राज्याच्या मुख्यमंत्रीपदी अजितदादांना बघण्याचे आमचे स्वप्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रूपाने पूर्ण होणार आहे,” असा विश्वास विश्वास शेळके यांनी व्यक्त केला. अजित पवारांना कार्ला एकविरा गडावर आणता आलं नाही याची सल मनाला टोचत असल्याचंही शेळके म्हणाले. 25 मार्च रोजी कार्ल्यातील एकविरा गडावरील देवीचा चैत्र महिन्यातील पालखी सोहळा पार पडला. त्याच पार्श्वभूमीवर शेळके बोलत होते.

सुनेत्रा पवारांविरोधात तिघे निवडणुकीच्या रिंगणार

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार तसेच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपाने बारामतीमधून उमेदवार न देण्याचं आवाहन केलं असून सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून आणण्याची भूमिका घेतली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. मात्र त्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध तिघांनी अर्ज दाखल केलाय.

सुनेत्रा पवारांविरोधातील एक जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी केला आहे. कृष्णा कदम हे ‘हिंदुस्तान जनता पार्टी’कडून निवडणूक लढवत आहेत. तर सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी ‘न्यू राष्ट्रीय समाज पार्टी’च्या वतीने बारामतीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुनेत्रा पवारांरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोणा-कोणाचा अर्ज कायम राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पोटनिवडणुकीची मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *