पोटनिवडणुकीत भाजपाची मोठी खेळी! बारामती बिनविरोध पण राहुरीत अचानक दिला उमेदवार; नावही जाहीर

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार आहे. 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार तसेच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपाने बारामतीमधून उमेदवार न देण्याचं आवाहन केलं असून सुनेत्रा पवारांना बिनविरोधा निवडून आणण्याची भूमिका घेतली आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी राहुरीमधून उमेदवार जाहीर केला आहे.

भाजपाचा उमेदवार कोण?

अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. मात्र राहुरीमधून भाजपा कोणाला तिकीट देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर भाजपाने राहुरीमधून आपला उमेदवार जाहीर केला आहे. राहुरीमधून भाजपाने अक्षय शिवाजीराव कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. वडिलांच्या निधानानंतर भाजपाने त्यांच्या मुलालाच उमेदवारी जाहीर केली आहे.

उमेदवाराचा अल्परिचय

अक्षय कर्डीले सध्या भाजप युवा मोर्चाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिवाजीराव कर्डीले हे अहिल्यानगरमधील राहुरी मतदारसंघातून अनेकदा निवडून आले होते. त्यांचा 17 ऑक्टोबर 2025 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याने अक्षय कर्डीले यांनी ‘शिव निर्धार यात्रा’ काढून मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्राजक्त तनपुरें अक्षय कर्डीलेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात असतील अशी दाट शक्यता आहे.

थाटात लग्न, फडणवीसांची हजेरी

कर्डीले कुटुंबीय अहिल्यानगरच्या राजकारणात सक्रिय आहे. अक्षय यांचे वडील शिवाजीराव कर्डीले हे दुधाचा व्यवसाय, बांधकाम साहित्य पुरवठा आणि हॉटेल व्यवसायातून जिल्ह्यातील एक नामवंत व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जायचे. 2021 मध्ये मोठ्या थाटात अक्षय यांचा विवाह झाला होता. या विवाहसोहळ्याला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांसारख्या मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

बारामती बिनविरोधात या भाजपाच्या भूमिकेवरुन निशाणा

राहुरीमध्ये भाजपाने उमेदवार जाहीर केला असला तरी बारातमीमधील बिनविरोध भूमिकेवरुन भाजपावर ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी निशाणा साधला आहे. “काहीही झालं तरी बारामतीची पोटनिवडणूक आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही,” असं हाकेंनी म्हटलं आहे. सातारा झेडपीत झालेलं रणकंदन फक्त आणि फक्त ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडण्यासाठीच होतं असा आरोपही हाके यांनी केला आहे. राज्यभरात नुकत्यात पार पडलेल्या झेडपी पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसीच्या सर्व आरक्षित जागा कुणबी मराठा नेत्यांनी बळकावून बारा बलुतेदारांच्या हक्काचं राजकीय आरक्षण गिळंकृत केलं असल्याचंही हाकेंनी म्हटलं आहे. भाजपने ओबीसी हा तर आमचा डिएनए हे असं म्हणूनच आमचा केसानं गळा कापल्याची टीका हाकेंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *