आनंदावर क्षणात दु:खाचा डोंगर! लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात; 5 ठार, 12 गंभीर जखमी

चामोर्शी तालुक्यातील तळोधी परिसरात रविवारी सायंकाळी लग्न समारंभ आटोपून परतणाऱ्या वऱ्हाड्यांच्या स्कॉर्पिओला समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक दिली. या भीषण अपघातात आठ वर्षांच्या चिमुकलीसह पाच जणांचा जागीच मृत्यू तर १२ गंभीर जखमी झाले आहेत.

विमल कान्हुजी गव्हारे व सुमन देवाजी गव्हारे दोघेही रा. कुनघडा, अनिकेत साईनाथ बरलावार रा. भडभिडी मो., आरोही मोगरकर (८) रा. गट्टेगुडा व अन्य एक अशी मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये प्रतिमा मोगरकर (३५), गुरुदेव कुनघाडकर (५५), निखिल जराते (१७), संजय वैरागडे (१७), कुणाल कन्नाके (२१), सुधाकर कुनघाडकर (६५), अमर चलाख (५७), देवाजी गव्हारे (६५), रेखा चलाख (५५), वेदांत वैरागडे (१६) व करण कुमरे (१६) यांचा समावेश आहे.

कुरुल-रामपूर येथील लग्न सोहळा आटोपून १६ वऱ्हाडी स्कॉर्पिओ (एमएच ४६ पी ५३९२) मधून भडभिडी मो.कडे निघाले होते. सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास तळोधी महामार्गावरील नवीन पेट्रोलपंपासमोर गडचिरोलीकडून येणाऱ्या प्रवीण टुर्स अँड ट्रॅव्हल्सच्या बसने (एमएच १५ सीके ५००५) त्यांना धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की, स्कॉर्पिओ चक्काचूर झाली. जखमींवर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीणकुमार किलनाके यांनी दिली. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

तर दुसऱ्या एका घटनेत, भोर तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत एक ठार आणि १२ जण जखमी झाले. पहिला अपघात सकाळी सात वाजता भोर-वरंध मार्गावर शिरगावच्या हद्दीत झाला. किवत गावातील १२ प्रवासी एका टेम्पोतून महाडला अंत्यविधीसाठी जात होते. दरम्यान, शिरगावच्या हद्दीत अपघात झाला. त्यात दहा महिला व एक पुरुष जखमी झाला. भोर-कापूर मार्गावर माळवाडी गावच्या एका वळणावर दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक बसून दुसरा अपघात झाला. अपघातात एक तरूण जागीच ठार झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *