पुण्याहून बीडला चोरीसाठी गेले, हायव्होल्टेज विजेच्या टॉवरवर चढताच आक्रित घडलं, दोघांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरातून एक मोठा प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील चाकण येथून हायव्होल्टेज विजेच्या टॉवरची तार चोरी करण्यासाठी आलेल्या टोळीवर काळाने घाला घातला. टॉवरची तार काढत असताना लोखंडी टॉवरचा समतोल बिघडून तो कोसळल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मयतांचे साथीदार त्यांचे पार्थिव कारमध्ये घालून परभणीला घेऊन गेले, मात्र तिथे पोहोचताच पार्थिव सोडून त्यांनी पळ काढला.

नेमकी घटना काय?

पुणे जिल्ह्यातील चाकण (मेदनकरवाडी) येथील अविनाश पटोळे (वय १७ वर्ष), आकाश श्रीराम आडे आणि त्यांचे अन्य साथीदार काल रविवारी रोजी रात्री १२:३०च्या सुमारास सुरज गिराम याच्या इर्टिगा कारमधून नांदुरघाट परिसरातील डोंगऱ्याचीवाडी शिवारात आले होते. येथील टोरँटो कंपनीच्या हायव्होल्टेज टॉवरचे काम अद्याप प्रलंबित असून त्यात वीजप्रवाह सुरू नव्हता. याचाच फायदा घेत हे तरुण टॉवरवर चढून महागड्या तारांची चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. तारा काढत असताना अचानक टॉवरचे एका बाजूचे संतूलन ढासळले आणि अवजड लोखंडी टॉवर जोरात जमिनीवर कोसळला. या भीषण अपघातात अविनाश पटोळे आणि आकाश आडे हे दोघेही टॉवरखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पुरावा नष्ट करण्याचा बनाव

अपघात घडल्यानंतर घाबरलेल्या साथीदारांनी पोलिसांना कळवण्याऐवजी या घटनेला अपघाताचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दोघांचे पार्थिव इर्टिगा कारमध्ये टाकले आणि थेट त्यांचे मूळ गाव असलेल्या परभणीकडे धाव घेतली. परभणीत पोहोचल्यानंतर, परिस्थिती अंगाशी येईल या भीतीने कारमधील इतर साथीदार आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत पार्थिव गाडीतच सोडून पसार झाले. शेवटी, कारचालक सुरज गिराम याने पार्थिव रुग्णवाहिकेतून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत मृतांच्या नातेवाईकांना संशय आल्याने त्यांनी गोंधळ घातला. ही माहिती मिळताच परभणी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेऊन सुरज गिरामला ताब्यात घेतलं.

तपास आणि पोलीस कारवाई

या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळी रक्ताचे डाग, मृतांच्या चपला आणि पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. बीड येथील फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन रक्ताने माखलेली माती आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा केले आहेत. परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बेद्रे यांनीही केजला भेट देऊन चालकाची चौकशी केली आहे. पुण्यातून चोरीच्या उद्देशाने आलेल्या या टोळीचा नेमका मास्टरमाईंड कोण आहे? आणि यात आणखी कोणाचा हात आहे? याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *