भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात होणाऱ्या नवनवीन उलगड्यांमध्ये आता आणखी एका गौप्यस्फोटाची भर पडली आहे. ज्यामध्ये तृप्ती देसाई यांनी नेमक्या कोणत्या महिला आमदार मंत्रिपदासाठी अशोक खरात याच्या नाशिकच्या कॉलेज रोडच्या ऑफिसला गेल्या होत्या आणि त्यांची इतर कोणत्या ठिकाणी भेट झाली होती यासंदर्भातील उलगडा केला.
माध्यमांशी संवाद साधताना हे नाव जाहीर होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. हे नाव म्हणजे विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे. ‘नीलम गोऱ्हे या तिथं पोहोचल्या होत्या’ असं सांगत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आणखी एक मोठं नाव अशोक खरात प्रकरणी समोर आणलं. ‘कोरोना काळापूर्वी एक्स्प्रेस इन नावाच्या नाशिकमधील पाथर्डी फाट्यावरील हॉटेलमध्ये गोऱ्हे मुक्कामाला होत्या. त्या मुक्कामाला असताना अशोक खरात या हॉटेलमध्ये नीलम गोऱ्हे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेला होता’, असं देसाई म्हणाल्या.
आतापर्यंत गोऱ्हेंचं मौन का? देसाईंचा सवाल
‘हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेकजण याप्रकरणी बोलत नव्हते, त्यात सर्वात महत्त्वाचा चेहरा होता नीलम गोऱ्हेंचा. आपण पाहिलं असेल, अगदी लहान प्रकरणं असली तरीही, त्याबाबत जाहीरपणे बोलणं, परिपत्रक काढणं अशा भूमिका त्या मांडत असतात. मात्र अधिवेशन पार पडूनही उपसभापती म्हणून तिथं असताना जिथं लैंगिक शोषणाचं प्रकरण आलं तर त्या त्या थेट पीडितेला भेटायला जातात. मात्र इथं 150 हून अधिक व्हिडीओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, तेजस्विनी सातपुते यांची एसआयटी अधिरीकपदी नियुक्ती झाली. तरीही एक महिला नेत्या म्हणून नीलम गोऱ्हे आतापर्यंत बोलल्या नाहीत’, ही बाब देसाईंनी लक्षात आणून दिली.
गोऱ्हेंनी मौन बाळगण्यामागचं कारण म्हणजे, अशोक खरातचा संबंध नीलम गोऱ्हेंशी असून, त्या भविष्य पाहण्यासाठी खरातला भेटायच्या. आपण ज्या 3 भेटींचा उल्लेख केला या भेटींमध्ये नीलम गोऱ्हे यांच्यासोबत जी मंडळी उपस्थित होती, त्यांनीच आपल्याला ही माहिती पुण्यात येऊन दिल्याचा दावा देसाईंनी केला. ‘नीलम गोऱ्हे या स्पष्टवक्त्या असल्यामुळं जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा त्यांनी सर्व सांगणं अपेक्षित होतं, याविरोधात आवाज उठवायला हवा होता. किंबहुना खरात, जरीही त्यांच्या परिचयाचा असला तरीही आता मी आवाज उठवणार अशी त्यांची भूमिका असायला हवी होती. कारण, महिला अत्याचारांविरोधात काम करण्यासाठी त्यांना विधानसभेचं तिकीट आणि संधी मिळाली’ याची आठवण तृप्ती देसाई यांनी करून दिली.
अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला गेलात
अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला गेलात, असं म्हणत तो जिथं लैंगिक अत्याचार करत होता त्या कॉलेज रोडवरील ऑफिसलाच तुम्ही त्याला भेटायला गेलात? मंत्रिपद हवं होतं म्हणून खरातच्या ऑफिसला गेला होतात?, असा सवाल त्यांनी केला. अशोक खरात कोरोनाच्या आधी एक्स्प्रेस इनमध्ये मुक्कामी असताना तो तुम्हाला भेटायला का आला होता? भविष्य की आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध? यासंदर्भात आम्हाला उत्तरं हवीयेत असा आग्रही सूर तृप्ती देसाईंनी आळवला. खरातच्या मोबाईलमध्ये गोऱ्हेंचा नंबर असल्यास ते सीडीआर तपासण्याची मागणी त्यांनी एसआयटीकडे केली.
