मुंबईसह कोणत्या जिल्ह्यांमध्ये सूर्य आग ओकणार? कुठं पाऊस अन् गारपीट शेकणार?

भारतातील जवळपास 17 राज्यांमध्ये वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभाग म्हणजेच आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये अनेक राज्यांत वाऱ्याचा वेग ताशी 80 किमी इतका प्रचंड असू शकतो. तर, काही राज्यांमध्ये गारपिटीसह मेघगर्जने आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील 24 तासांत राज्यात हवामान बदलांचा इशारा 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये वादळी पावसास राज्याच्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्यात दक्षतेचा ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. प्रामुख्यानं अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर इथं वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, सांगली, नाशिकमध्येसुद्धा वादळी पावसाची हजेरी नाकारता येत नाही असा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यात एकिकडे पावसाचा हा इशारा असतानाच दुसरीकडे मात्र मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड इथं उष्णतेचा तडाखा बसत आहे. दुपारच्या वेळी पारा 36 अंशांपलिकडे आणि विदर्भासारख्या काही भागांमध्ये चाळीशीपर्यंत जात असल्य़ा कारणानं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन यंत्रणांनी केलं आहे. उर्वरित राज्यात आकाश अंशत: ढगाळ, सायंकाळी सोसाट्याचा वारा आणि किनारपट्टी भागांमध्ये दमट हवा अशी स्थिती कायम राहील हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पाच दिवस वादळी पावसाचे

राज्यात उष्णतेच्या लाटेनंतर आता वादळी पावसाचे संकट उभं ठाकलं आहे. सोमवारपासून पुढील पाच दिवस बहुतांश भागांत वादळी वाऱ्यासह पावसासह गारपिटीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणही यास अपवाद नाही.

पावसाची स्थिती नेमकी का निर्माण होतेय? 

सध्या कर्नाटकाच्या दक्षिणेपासून समुद्रसपाटीवरून 5.8 किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर, उत्तर ओडिशा, दक्षिण तामिळनाडूपर्यंत वाऱ्याचा प्रवाह खंडित होत असल्यानं कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. ज्यामुळं महाराष्ट्रात पावसास पूरक स्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *