उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत हक्काचे आसन मिळवण्यासाठी आरक्षित तिकीट घेऊन प्रवास करण्याकडे सर्वसामान्यांचा ओढा असतो. अशातच राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. राज्यात २५१ आगार आणि ६१० स्थानकांसाठी केवळ १२२ प्रवासी आरक्षण केंद्रे कार्यान्वित आहेत. यामुळे प्रवाशांना आरक्षित प्रवासासाठी जादा रुपये देऊनही तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे.
मार्च महिना संपायला काही दिवसच असल्याने गावी जाणाऱ्यांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. प्रवासातील गर्दी आणि आसनांसाठी होणारी धावपळ टाळण्यासाठी आगाऊ आरक्षण करून प्रवास करण्याकडे सर्वसामान्यांचा कल आहे. एसटी महामंडळाच्या मोबाइल अॅप, संकेतस्थळावरून आरक्षित तिकीट घेता येते. मात्र तांत्रिक अडथळे, ऑनलाइन गाड्या उपलब्ध नसणे, भाडे वजा होणे पण तिकीट न येणे यांमुळे प्रवासी आरक्षण केंद्रावर जाऊनच तिकीट घेणे पसंत करतात.
एसटी महामंडळाने ‘ई-बिक्स’सोबत २०२६मध्ये करार केला. त्यानंतर आरक्षण केंद्रांची संख्या कमी करण्यात आली. एसटी प्रवासासाठी महामंडळाने खासगी आरक्षित केंद्रे सुरू केली होती. त्यात गैरव्यवहार आढळल्याने ती बंद करण्यात आली. मात्र, त्याजागी नव्याने नेमणुका करण्यात आलेल्या नाहीत.
गर्दीतील प्रवास टाळण्यासाठी आरक्षित तिकीट घेऊनच प्रवास करतो. मुलगा कामाला गेल्याने मी आता रांगेत उभा आहे. इथे पिण्याच्या पाण्याची तसेच बसण्याची सुविधा नाही. आरक्षित तिकीट घेण्यासाठी किमान दोन तास लागतात’, अशी प्रतिक्रिया गणेश पाटील यांनी दिली.
अनेक प्रवासी निश्चित प्रवासासाठी एसटीकडे वळू लागले आहेत. मात्र, आरक्षित तिकिटासाठी रांगेत वेळ वाया जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
