चौथ्या महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या चित्तथरारक अंतिम लढतीत कोल्हापूरच्या अमृता पुजारीने वेदिका सासनेला अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि निर्झरा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर रविवारी सायंकाळी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत अमृता पुजारी विरुद्ध वेदिका सासणे यांच्यात झाली. सुरुवातीपासून अमृता हिने आक्रमक चाल खेळत वेदिकाला कब्जात ठेवले. पहिल्या दीड मिनिटात दोन गुण मिळवत आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा तीन गुण मिळवून पहिल्या सत्रात पाच शून्य अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात वेदिकाने आक्रमक चाल खेळली परंतु अमृताने संयम दाखवत पुन्हा दोन गुण घेतले आणि विजय पक्का केला. शेवटचे दोन मिनिटे अमृताने डिफेन्स करत वेदिकाला थोपवून ठेवले. ७-० अशा फरकाने अमृताने वेदिकाचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.
चांदीची गदा, कारची चावी प्रदान
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी याला चांदीची गदा, रोख ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोनेट कारची चावी प्रदान करण्यात आली. तर उपविजेत्या वेदिका सासनेला २५ हजार रुपये रोख , स्मृतिचिन्ह आणि बुलेट बक्षीस देण्यात आली .अमृता पुजारी हिने वेदिका सासने हिच्यावर मात केल्यानंतर समर्थक महिला कुस्तीपटू यांनी अमृता पुजारी आणि प्रशिक्षक दादासो लवटे यांना खांद्यावर घेऊन कुस्तीच्या मैदानामधून हलगीच्या कडकडाटात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली.
महिला कुस्ती स्पर्धेसाठी 50 लाख रुपये देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार – पालकमंत्री गोरे
पुरुष कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासन एक कोटी रुपयांचा निधी देते. परंतु महिला कुस्तीसाठी कोणतीही तरतूद नाही. पुढील वर्षीपासून महिला कुस्ती स्पर्धेसाठी राज्य शासनाने 50 लाख रुपये द्यावेत, असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाषणात सांगितले.
