आता रुपाली चाकणकरांच्या पतीचा ‘उद्योग’.. तटकरेंच्या होम ग्राऊंडवरच ‘पार्टनर’! खुलाश्याने खळबळ

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकरांसंदर्भात नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे. खरात प्रकरणामुळे राज्याच्या महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि पक्षातील महिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकरांबरोबरच पक्षाचे वरिष्ठ नेते सुनील तटकरेंचेही खरातसोबतचे काही फोटो समोर आले आहेत. या प्रकरणावरुन चाकणकरांबरोबरच तटकरेंवरही टीका केली जात आहे. असं असतानाच आता याच प्रकरणी एसआयटीच्या चौकशीला समोरं जाण्याच्या तयारी असलेल्या रुपाली चाकणकरांच्या रायगडमधील संपत्तीसंदर्भात खळबळजनक माहिती समोर आली आहे.

नेमकी व्यवसायिक गुंतवणूक कोणती?

अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकर आणि तटकरे यांना टिकेचे लक्ष केलं जात आहे. दोन दिवसांपूर्वी सुषमा आंधारे यांनी पत्रकार परिषद घेत चाकणकर, चौधरी आणि तटकरे यांचे व्यावसायिक कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. याबाबत आता मोठी माहिती पुढे आली आहे. तटकरे यांचं होम ग्राऊंड असलेल्या रोह्यात निलेश चाकणकर आणि आकाश चौधरी हे कंस्ट्रक्शन व्यवसायात एकत्र असल्याची माहिती समोर आली आहे. आकाश चौधरी आणि निलेश चाकणकर यांनी पार्टनरशिपमध्ये ‘कर्मा कंस्ट्रक्शन एल एल पी’च्या माध्यमातून रोह्याच्या रोठ खुर्द येथे बहूमजली इमारत उभी केली आहे. निलेश चाकणकर हे रुपाली चाणकरांचे पती आहेत.

या बांधकामाविरोधात कोर्टात याचिका

चाकणकर आणि चौधरी यांच्या रोह्यातील इमारत बांधकाम प्रकरणी भाजपचे अल्पसंख्यांक सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बबलू सय्यद यांनी माणगाव कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. अनधिकृतपणे चुकीच्या पद्धतीने बांधकाम केल्याचं हे प्रकरण असून यामुळे चाकणकरांचे चौधरी यांच्या सोबत रायगडमध्ये व्यवसाय सुरु असल्याच्या दाव्याला पुष्टी मिळत आहे.

सासरच्या कनेक्शनमुळेच रुपाली चाकणकर राजकारणात आल्या

लग्नानंतर, रुपाली चाकणकरांच्या सासरच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. रुपाली चाकणकर यांचा जन्म दौंडमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या साधना महाविद्यालयात शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून केली. रुपाली चाकणकर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी महिला आयोगाच्या अध्यक्षा होण्यापूर्वी संभाळलेली.

ऑक्टोबर 2021 मध्ये, रुपाली चाकणकरांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. हे पद महाविकास आघाडी सरकारच्या काळात बराच काळ रिक्त होते. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची पुन्हा या पदावर नियुक्ती करण्यात आली. निलेश चाकणकर लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करतात. मात्र, काही बातम्यांनुसार, निलेश चाकणकर हे शेतकरी कुटुंबातील असून, त्यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. रुपाली चाकणकरांच्या मुलाने (सोहन चाकणकर) मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

आज होणार रुपाली चाकणकरांची चौकशी

अशोक खरात प्रकरणात ईशान्येश्वर मंदिराच्या ट्र्स्टवरील सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांची चौकशी एसआयटीकडून केली जात असून यामध्ये रुपाली चाकणकरांचीही चौकशी केली जाणार आहे. ही चौकशी आज म्हणजेच 30 मार्च रोजी नाशिकमध्ये होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

खरात प्रकरणातील आर्थिक कनेक्शनवरुन रुपाली चाकणकर काय म्हणालेल्या?

खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारात,त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही. आजही तीच स्पष्ट व ठाम भूमिका आहे.तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे, असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच, असा विश्वास चाकणकरांनी पक्षाचं महिला अध्यक्षपद सोडताना व्यक्त केलेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *